Unique Village : गोष्ट एका कर्तुत्ववान गावाची, 'काकडधरा'

गावातील प्रत्येक सामूहिक सुविधा निर्मितीत गावातील लोकांचे श्रमदान मोलाचे आहे. मग ती शाळा असो की पाणलोट सर्व ठिकाणी गावाचा हातभार आहे.
Kakaddara Village
Kakaddara Villageesakal

कर्तृत्ववान गाव

'काकडधरा'

पाणी जीवन आहे. त्याशिवाय विकास नाहीच. विकास शब्द व्यापक आहे. आपण सुविधांना विकास मानतो. पण, झोपडीतील अशिक्षित कष्ट उपसणारा आदिवासी प्रकृतीच्या नियमाला विकास मानतो. तो पर्यावरणपूरक विकासावर विश्वास ठेवतो. वर्धा जिल्ह्यातील काकडधरा डोंगराच्या माथ्यावरील आदिवासींचे लहान गाव. गावातील प्रत्येक सामूहिक सुविधा निर्मितीत गावातील लोकांचे श्रमदान मोलाचे आहे. मग ती शाळा असो की पाणलोट सर्व ठिकाणी गावाचा हातभार आहे.

गोंड आणि कोलम जमाती येथे राहतात. सालधरा ग्रामपंचायतीत हे गाव आहे. जेमतम ३७५ लोकसंख्या आणि ७५ कुटुंब. गाव आजही अनेक सुख-सुविधांपासून वंचित आहे. पक्का रस्ता नाही, बस नाही, स्थानिक आरोग्य व रोजगाराच्या सुविधा नाहीत. आजही अधिकतर घरे कुडामातीचीच. घराचे कुंपण तुराट्या, पऱ्हाट्या, बांबूचेच.

गावातील माणसे साधीभोळी व निर्मळ मनाची. माणूसपण जपणारी. इतरांना प्रेम वाटणारी. आहे त्यात आनंद मानणारी. गावहितासाठी कर्तृत्व करणारी. एकमेकांच्या सुख-दुःखात संघभावनेने नागरिक एकत्र येतात. गावकरी ग्रामसभेला विशेष महत्त्व देतात. सामूहिकता, निर्णयक्षमता आणि निसर्गाप्रती प्रेमभावना व पाणलोट उपचारासाठी श्रमदान गावाचे विशेष. गाव आर्थिकदृष्ट्या मागास असले तरी विचारांची श्रीमंती मोठी आहे.

अलीकडे जिथे लोकांना एकमेकांना भेटायला वेळ नाही तिथे येथील गावकरी जंगलातील पाणलोट रचना टिकून राहाव्या म्हणून श्रमदान करतात. नुकतेच १ मे २०२३ रोजी गावकऱ्यांनी महाश्रमदानाचे आयोजन करून पाणलोटाच्या रचनाची दुरुस्ती केली. या श्रमदानाला जिल्हाधिकारी, तहसीलदार व सामाजिक संस्था व कार्यकर्ते अशा २०० व्यक्तींनी श्रमदानातून योगदान दिले. गावातील नागरिक पाणलोट कामात प्रशिक्षित आहेत. त्यांना पाणलोट उपचारांच्या सर्व कार्यपद्धती माहिती आहेत.

‘असेफा’ संस्थेच्या मार्गदर्शनात शास्त्रीय पाणलोट उपचार कौशल्य त्यांनी आत्मसाद केले. १९८१ पासून संस्थेच्या मार्गदर्शनात गावकरी पाण्यावर काम करतात. श्रमदान गावकऱ्यांचा पाया आहे. पाषाणावर त्यांनी गाव बसविले. त्यामुळे गावाला पाणी पाहिजे तर त्यासाठी काम केले पाहिजे, असे त्यांना वाटते. आपले मतभेद बाजूला सारून सामूहिक घेतलेल्या निर्णयावर गावकरी अंमलबजावणी करतात.

‘पाणी फाउंडेशन’अंतर्गत २०१७ मध्ये सत्यमेय जयते वॉटर कॅम्प स्पर्धेचे काकडधरा गाव राज्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. गावाला शहारूख खान यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचे पहिले बक्षीस देण्यात आले.

Kakaddara Village
Maharashtra Din : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात श्री रामदास स्वामींच्या पावलांवर कोसळतो धबधबा, एकदा बघाच

२०० वर्षांपूर्वी काकडधराने प्लेगची महामारी अनुभवली. १९८१ मध्ये गावाला आग लागली आणि गाव पूर्णतः आगीतून होरपळले. खायला अन्न व अंगावर कपडे नाही, अशी त्यांची स्थिती होती. बाहेरील लोक व प्रशासनाने पुढाकार घेऊन गावाला मदत केली.

गाव पुन्हा उभारणीसाठी निवाऱ्याला दोन-तीन टीनपत्रे मदत स्वरूपात कुटुंबाला मिळाले. त्याच्या झोपड्या करून पुन्हा गाव उभे राहिले. आजही गावात कुडामातीची घरे अधिक दिसतात. गावाला चळवळीची पार्श्वभूमी आहे. विनोबाजींच्या भूदान चळवळीत अनेक लोकांनी जमिनी दान केल्या. गावातील जमीन भूदान न देता गावातील मालगुजार फत्तेसिंग यांनी स्वतः १०० एकर शेती चार एकरप्रमाणे भूमिहीनांना वाटली.

दान केलेल्या १०० एकरावर सिलिंग लागू झाले तेव्हा फत्तेसिंग यांच्या मुलाने ती जमीन लोकांना मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात लढा देऊन जमिनीचे वितरण केले. त्यामुळे काहींना जमीन मिळाल्याचे , ज्येष्ठ नागरिक नामदेव मुंडेकर सांगतात. नामदेव मुंडेकर यांच्या नेतृत्वात ग्रामसभा मजबूत झाली.

नशाबंदी, कुऱ्हाडबंदी उपक्रम राबविण्यात आले. आरोग्याला पर्याय म्हणून आरोग्यफंड उभारणारे तालुक्यातील पहिले गाव असावे. आजही नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या व्यक्तीला फंडातून कर्ज मिळते. झाडे लावून ती जगवली व गावाच्या मालकीचे जंगल उभे केले. (Villages)

Kakaddara Village
Lifestyle Blog : मुलाच्या घरात राहायला नको वाटते....!

गावात रोजगार निर्मितीसाठी लोकांनी वाकापासून दोऱ्या व मटाट्या बनवून रोजगार चालविला. सामूहिक विक्रीतून ठोक भावात व्यापारी माल नेत होते. ‘असेफा’ संस्थेने गावात प्रभावी काम केले. शेती विकासासाठी इंजिनिअर मधुकर खडसे यांनी गावातील सामान्य माणसाला शेती, माती, पाणीच्या उपचार पद्धतीचे शास्त्रीय ज्ञान दिले. (Motivational Story)

गणेश रामगडे, अरुण लुंगसे असे अनेक जण प्रशिक्षित झाले. आज अनेक व्यक्ती माथा ते पायथा पाणलोट क्षेत्राचे अचूक निदान करतात. अरुण लुंगसे उपसरपंच आहेत. त्याच्या पुढाकारातच एक मे रोजी श्रमदान झाले. ते पाणी फाउंडेशनमध्ये प्रशिक्षकही होते.

स्पर्धा काळात या गावात प्रशिक्षण सेंटर होते. गावातूनच अनेकांनी पाणलोट उपचार पद्धतीचे ज्ञान आत्मसात केले. अशिक्षित लोकांनी शिक्षित लोकांना पाणलोटाच्या उपचाराचे शिक्षण दिले. गावात पाणलोट व रोजगार निर्मितीसाठी शासनाने विशेष कार्यक्रम राबावे, ही अपेक्षा.

मारोती चवरे

दहेगाव गोंडी, ता. आर्वी, जि. वर्धा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com