esakal | फक्त नाशिकच नाही, तर 'या' ठिकाणीही वायूगळतीनं गेले होते अनेकांचे जीव
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

फक्त नाशिकच नाही, तर 'या' ठिकाणीही वायूगळतीनं गेले होते अनेकांचे जीव

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : राज्यात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातच आता नाशकातील झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लिकेज झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही प्राणवायू गळतीची देशातील पहिलीच घटना असावी. मात्र, आपल्या देशात इतर वायू गळतींपैकी ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील वायू गळतींच्या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती, पण मोदी लावणार नाहीत'

भोपाळ वायू गळती -

गॅस गळतींच्या घटनांमुळे जीवितहानी झाल्याचा जखमा अजूनही आठवतात. यापैकीच एक घटना म्हणजे भोपाळ गॅस गळती. ही घटना आठवली तरी आजही अंगावर काटा उभा राहतो. २ मार्च १९८४ साली भोपाळ येथील यूनियन कार्बाईड लिमिटेड पेस्टीसाईड प्लांटमध्ये मिथाईल आयसोसायनाईड या विषारी वायूची गळती झाली होती. यामध्ये जवळपास चार हजार लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ५ लाख लोकांवर गंभीर परिणाम झाला होता. ही झाली ८०च्या दशताली घटना. मात्र, २१ व्या शतकातही अशा घटना पाठ सोडत नाहीयेत.

हेही वाचा: आशिष देशमुखांचा सरकारला घरचा आहेर, राज्यात आणीबाणी लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

GAIL कंपनी पाईपलाईन गळती -

गेल्या २ जून २०१४ ला आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नागाराम येथे गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) द्वारे देखभाल करण्यात येत असलेल्या भूमिगत गॅस पाइपलाइनमध्ये गॅस गळती होऊन स्फोट झाला होता. यामध्ये भयंकर आग लागून जवळपास १५ लोकांचा मृत्यू झाला होता, ४० लोक गंभीर जखमी झाले होते. परिसरातील लोकांनी त्या पाईपलाईनबद्दल गेल कंपनीला तक्रार देखील केली होती. मात्र, कंपनीने कुठलीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे हा स्फोट झाल्याचे बोलले जात होते. स्फोटाचा परिणाम इतका तीव्र होता की त्यामुळे जमिनीवर प्रचंड मोठा खड्डा पडला आणि क्षणार्धातच आग पसरून घरे, नारळाच्या झाडांना आग लागली होती. यामध्ये कमीतकमी २० घरे जळून खाक झाली होती.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

भिलाई स्टील प्लांट वायू गळती -

छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमधील वॉटर पम्प हाऊसमध्ये २०१४ मध्ये मिथेन वायूची गळती झाल्याची घटना घडली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता, तरर ४० जण जखमी झाले होते. मृत्यूमुखी पडलेले सहा जण हे भिलाई स्टील प्लांटमधील कर्मचारी होते. यामध्ये दोन डेप्युटी मॅनजरचा देखील समावेश होता.

दिल्ली वायू गळती -

२०१७ मध्ये दिल्लीतील तुघलकाबाद आगारातील सीमाशुल्क क्षेत्रातील दोन शाळांजवळ कंटेनर डेपोमधून विषारी वायूची गळती होती. यामध्ये जवळपास ४७० विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास झाला होता. तसेच अनेकांना श्वास घेण्यास देखील अडचण होत होती.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : मृत्यूतांडव.. हाहाकार! सखोल चौकशीची मागणी

भिलाई स्टील प्लांट गॅस पाईपलाईन लिकेज -

गेल्या २०१८ ला भिलाई स्टील प्लांटमध्ये कोक ओव्हन बॅटरी कॉम्प्लेक्स क्रमांक ११ च्या गॅस पाइपलाइनला अनुसूचित देखभाल कामाच्या वेळी वायू गळती होऊन स्फोट झाला होता. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये ९ जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर उर्वरीत उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती, की डिएनए टेस्ट करून मृतांची ओळख पटवावी लागली होती.

Vizag वायू गळती -

गेल्या ७ मे २०२० ला आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधीलVizag येथे एलजी पॉलीमर्स या प्लांटमध्ये वायूगळती झाली होती. यामध्ये जवळपास ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.