raut.jpg
raut.jpg

संजय राऊत म्हणतात, त्यांचा शिवसेना संपवायचा कट होता, पण पवार साहेबांनी...

मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला, त्यावर आज ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला  टाेला लगावला आहे.

ते म्हणतात की, भाजपने शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवायचा कट रचला होता, त्यासाठी त्यांना शरद पवार यांची साथ हवी होती. परंतू शऱद पावर त्यांच्या जहरी कटला बळी पडले नाहीत. तिथेच भाजपचा डाव फसला. भाजपला शिवसेना संपविण्यासाठी शरद पवार यांची गरज होती, पण पवार साहेबांनी वेऴीच भाजपचा डाव ओळखून त्यांनाच पाणी पाजले. 

राऊत पुढे म्हणतात, भाजपचे अमित शहा व अन्य नेते खासदारकी व विधानसभेच्या निवडणुकीत रोज शरद पवार यांच्यावरती टीका करत होते. ते विचारत होते की, महाऱाष्ट्रासाठी शरद पवार यांनी काय केले. ज्या राष्ट्रवादीला हे भ्रष्टवादी तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेला पक्ष असे समजत होते, त्यांच्याबरोबरच नंतर सत्तेसाठी जायला तयार होते. हाच भाजपचा दुटप्पीपणा आहे. 

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी दीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत मोदींची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर मोदींनी मला थांबण्यास सांगितलं आणि माझ्यासमोर एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. आपण एकत्रित काम केलं तर मला त्याचा आनंद होईल, असं मोदी म्हणाले. त्यावर आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत आणि ते यापुढेही राहतील. पण राजकीयदृष्ट्या तुमच्यासोबत काम करणं मला शक्य होणार नाही, असं सांगत मी त्यांची ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.

दरम्यान, पवारांनी मोदींना राजकीयदृष्ट्या एकत्र काम करणं शक्य नसल्याचं सांगितल्यानंतरही मोदींनी त्यांना एकत्रित काम करण्याबाबत त्यांची मनधरणीही केली. विकास, उद्योग आणि शेतीबाबतची आपली मतं सारखीच आहे. त्यात आपली भूमिका वेगळी नाही, मग मतभिन्नता कुठे आली? असा सवाल करत विरोधकांनीही आमच्यासोबत येऊन देशासाठी काम केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. त्यावर विरोधाला विरोध करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे तुम्हाला विरोधाला विरोध होणार नाही. तसेच मी एक छोटासा पक्ष चालवतो. माझ्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आजपर्यंत जी दिशा दिली आहे, ती बदलणं आता शक्य नाही. त्यामुळे तुमचा एकत्रित येण्याचा आग्रह मी स्विकारू शकत नाही, असं पवारांनी मोदींना सांगितलं.

शरद पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडावरही भाष्य केलं. आजच्या आज तुम्ही शपथ घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, अशी अट अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना घातली होती. मात्र यातील मला काहीही माहित नव्हतं. मलाही सकाळीच फोन आल्यावर मी टीव्ही पाहिला तेव्हा अजितने शपथ घेतल्याचं मला दिसलं. एवढ्या सकाळी हे घडतंय हे पाहून मला विश्वासच बसला नाही. मात्र शपथविधीला उपस्थित असलेले चेहरे पाहिल्यानंतर मी निर्धास्त झालो. कारण माझ्या शब्दाचा मान ठेवणारे हे लोक होते. ते परत येतील आणि जे घडलंय ते आपण दुरुस्त करू शकतो, याचा मला विश्वास होता, असंही पवारांनी सांगितलं. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे सुद्धा एवढ्या पहाटे किती जोमाने काम करतात हे सुद्धा मला पहिल्यांदाच पाह्यला मिळालं, असा चिमटाही त्यांनी काढला.

शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची मनधरणी कशी करण्यात आली हे सुद्धा पवारांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. शिवसेनेने आणीबाणीला दिलेला पाठिंबा, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकही उमेदवार न देता काँग्रेसला अप्रत्यक्षपणे केलेली मदत, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना दिलेला पाठिंबा आदी गोष्टी सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससाठी कशा अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्यात याकडेही सोनिया गांधी यांचे लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे पालिका निवडणुकीतही बाळासाहेबांनी काँग्रेसला केलेली मदत याचीही आठवण सोनिया गांधींना करून दिली, असं पवार म्हणाले.

सोनिया गांधींना राज्यातील काँग्रेस नेत्यांची अस्वस्थताही कळाली असावी आणि शिवसेनेसोबत जाण्याचं झालेलं वातावरणही त्यांच्या लक्षात आलं असावं, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा असं पवार म्हणाले.

विरोधक एकवटणार- भाजपविरोधात सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत अद्याप काहीही चर्चा सुरू झालेली नाही. पण अशी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. देशामध्ये भाजपविरोधात सक्षम पर्याय द्यायला हवा. यावर लोक चर्चा करत आहेत. मात्र त्यावर आम्ही अद्याप पुढे गेलेलो नाही, असं भविष्यातील संकल्प मांडताना पवार म्हणाले. अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष तितके प्रबळ नाहीत. हे मान्य आहे. पण जर आम्ही महाराष्ट्रात वेगळा प्रयोग करून बलशाली होऊ शकतो, तर इतर राज्यातही ते व्हायला हवं. काँग्रेस पक्ष हा देशात विस्तारलेला पक्ष आहे. काँग्रेसचा देशभर बेस आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल, असंही ते म्हणाले. या सर्व बाबींवरून संजय राऊत यांनी भाजवर निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com