क्रीडा क्षेत्रामध्ये संशोधनाची सुरुवात

केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ३,३९७.३२ कोटींची तरतूद करण्यात आली
Abhijit Deshmukh Beginning of research field of sports budget 2023
Abhijit Deshmukh Beginning of research field of sports budget 2023esakal
Summary

केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ३,३९७.३२ कोटींची तरतूद करण्यात आली

- अभिजित देशमुख

यंदाच्या वर्षी चीनमध्ये आशियायी क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. तसेच पुढील वर्षी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बुधवारी मांडल्या गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ३,३९७.३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची क्रीडा क्षेत्रासाठीची सर्वात जास्त तरतूद ठरली आहे.

मागील वर्षीपेक्षा ३३४.७२ कोटींचा अधिक निधी भारतीय क्रीडा क्षेत्राला मिळणार आहे. मागील वर्षी हा निधी ३०६२.६० कोटी इतका होता. मात्र, या निधीमध्ये येत्या वर्षभरात खेळाडूंच्या गरजा आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या सूचनेनुसार बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील तरुण आणि नवोदित खेळाडूंना स्पर्धांची तयारी व्हावी म्हणून सुरु करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ साठी १००० कोटींचा निधी देण्यात आला आहे. तो एकूण क्रीडा अर्थसंकल्पाच्या तब्बल ३० टक्के आहे. मागीलवर्षी पेक्षा २६ कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी खेलो इंडियासाठीची तरतूद ९७४ कोटी रुपये होती.

राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या निधीमध्ये ४५ कोटींची वाढ करण्यात आली असून आता त्यासाठीची तरतूद २८० कोटींहून ३२५ कोटींवर पोचली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीत मात्र एक कोटींची कपात करण्यात आली असून तो आता १६ कोटींहून १५ कोटी झाला आहे. क्रीडा विज्ञानाने खेळाडूंची दुखापत मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

विकसित क्रीडा तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्रासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्राच्या देशभर शाखा असून खेळाडूंच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे योगदान देत आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये क्रीडा सुविधा उभ्या करण्यासाठी १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. घोडेस्वारी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. या खेळासाठी लागणारे परदेशातील घोड्यांवरचे सीमा-शुल्क संपूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

फवाद मिर्झा सारख्या खेळाडूला याचा फायदा होणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या तरतुदीने देशातील खेळाडूंना फायदाच होणार आहे. अशीच भरघोस तरतूद क्रीडा क्षेत्रासाठी पुढील वर्षांत सुद्धा करण्यात आली तर या क्षेत्रातील रोजगार वाढणार असून, यामध्ये क्रांती सुद्धा घडण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रासाठीच्या वाढीव तरतुदीमुळे देशात आणखी मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होईल. क्रीडा विज्ञान आणि संशोधनासाठी १३ कोटींची तरतूद ही चांगली सुरुवात आहे. मात्र, आगामी काही वर्षांत या क्षेत्राला आणखी तरतुदीची गरज आहे.

भरीव तरतूद

  • खेलो इंडिया : १०४५ कोटी

  • भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) : ७८५.५२ कोटी

  • राष्ट्रीय क्रीडा महासंघ : ३२५ कोटी

  • राष्ट्रीय सेवा योजना : ३२५ कोटी

  • राष्ट्रीय क्रीडा विकास निधी : १५ कोटी

  • खेळाडूंच्या बक्षिसासाठीचा निधीः ४५७ कोटी

  • खेळाडूंसाठीचा प्रोत्साहन भत्ताः ४५ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com