'मोदी सरकारमुळं गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं'; वाचा राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे I Budget Session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget Session 2023 President Draupadi Murmu

ड्रोन आणि सौरऊर्जेमुळं देशातील शेतकरी सक्षम झाला आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या पंचप्राण योजनेमुळं आपल्याला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालंय.

Budget Session : 'मोदी सरकारमुळं गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं'; वाचा राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

Budget Session 2023 : आज म्हणजेच मंगळवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं.

संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, सामाजिक न्याय यासह अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेचंही कौतुक केलं. मुर्मू म्हणाल्या, 'सरकारनं कोणताही भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम केलंय, ते निश्चित कौतुकस्पद आहे.'

राष्ट्रपतींनी आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं की, 'भारत आता हेरिटेजसोबतच तंत्रज्ञानातही आघाडी घेत आहे. ड्रोन आणि सौरऊर्जेमुळं देशातील शेतकरी सक्षम झाला आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या पंचप्राण योजनेमुळं आपल्याला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालंय. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत.'

राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 मोठ्या गोष्टी

  • आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. हा नव्या युगाचा नवा भारत आहे. स्वातंत्र्याच्या अमृताचा काळ आहे. असा भारत बनवायचा आहे, जो गरीब असणार नाहीये.

  • गुलामगिरीच्या प्रत्येक खुणातून, प्रत्येक मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असतं. पूर्वी जो राजपथ होता, तो आता कर्तव्यपथ झाला आहे.

  • भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं सरकारचं मत आहे, त्यामुळं गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्यानं लढा सुरू आहे.

  • वन नेशन वन रेशन कार्ड आणि आयुष्मान भारत योजनेनं देशातील कोट्यवधी गरीब लोकांना आणखी गरीब होण्यापासून वाचवलंय.

  • सरकारनं कोणताही भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम केलंय. नव्या परिस्थितीनुसार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढं चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • शतकानुशतकं वंचित राहिलेल्या प्रत्येक समाजाच्या इच्छा सरकारनं पूर्ण केल्या आहेत. गरीब, दलित, मागास, आदिवासी यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना नवी स्वप्न दाखवली आहेत.

  • सरकारनं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्या आहेत. हाच वर्ग विकासाच्या लाभापासून सर्वाधिक वंचित होता.

  • शासनाच्या अनेक योजनेमुळं आज आई आणि मूल दोघांनाही वाचवण्यात यश आलंय. मुलींच्या शिक्षणापासून त्यांना सर्व सुविधा देण्यापर्यंत सर्वच विषयांवर सरकार काम करत आहे.

  • किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना फायदा झाला. एका बाजूला मंदिरं बांधली आणि दुसऱ्या बाजूला संसद बांधली. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे.

  • भारत जगातील सर्वात मोठी अंतराळ शक्ती बनत आहे, असंही आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं.