
केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवारपासून सुरु होत आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवारपासून सुरु होत आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. गेल्या काही वर्षांपासूनच्या नव्या पायंड्यानुसार, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी रोजी आणले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्री तिसऱ्यांदा अर्थमंत्री म्हणून बजेटचे सादरीकरण करणार आहेत.
आर्थिक सर्वेक्षणाचे सादरीकरण
आर्थिक सर्वेक्षण 2020-21 चे सादरीकरण आज शुक्रवारी 29 जानेवारी रोजी केलं जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी निर्मला सीतारामण याचं सादरीकरण करतील. सामान्यत: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीलाच आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं. या सर्वेक्षणात आर्थिक वर्षातील विकासाबाबतचा आढावा घेतला जातो. यामध्ये कृषी क्षेत्र, औद्योगिक उत्पादन, रोजगार, आयात-निर्यात इत्यादी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या बाबींबाबत चर्चा केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे झालेल्या नुकसानाबाबतची चर्चा अधिक प्रमाणात असल्याची चर्चा आहे. आर्थिक सर्वेक्षण हा अर्थमंत्र्यांद्वारे सादर केला जाणारा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज मानला जातो. हा दस्ताऐवज मुख्य आर्थिक सल्लागारांच्या सल्ल्याने केंद्र सरकारकडून तयार करण्यात येतो.
हेही वाचा - दशकातलं पहिलं बजेट देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण; PM मोदी संसदेत दाखल
केंद्रीय अर्थसंकल्प कुठे पाहता येईल?
29 जानेवारी ते 8 एप्रिलदरम्यान यंदाचं हे अधिवेशन होणार आहे. यामध्ये 15 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान विश्रांती घेण्यात येईल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2021 चे थेट प्रसारण लोकसभा टिव्हीवर करण्यात येतं. त्याचप्रमाणे दूरदर्शन आणि राज्यसभा टिव्हीवर देखील याचं थेट प्रक्षेपण करण्यात येतं. तसेच अनेक फेसबुक, युट्यूबसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील याचं प्रक्षेपण करण्यात येतं.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. देशातील 16 विरोधी पक्षांनी बहिष्कार घालत असल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं होतं. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल गुरुवारी माहिती दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आययूएमएल, आरएसपी, एमडीएमके, केरळ कांग्रेस आणि एआययूडीएफ या पक्षांचा यात समावेश आहे. सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी भारताचा 2021 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडण्यास सुरुवात करतील.