Budget 2021: 'जनताविरोधी' बजेटनं सगळी क्षेत्रं विकून टाकली; ममता कडाडल्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

या बजेटवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सडकून टीका केली आहे.

Union Budget 2021 : आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. 

या बजेटवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, हे बजेट जनता विरोधी बजेट आहे. हे भाजपवाले नेहमीच खोटी विधाने करतात. भारतातील पहिल्या 'पेपरलेस' बजेटने जवळपास सर्व क्षेत्रं विकलेली आहेत. या बजेटमध्ये अंसघटीत क्षेत्रासाठी काहीही तरतूद नाहीये. 

या बजेटवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की, सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने देशाची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलदार मित्रांच्या हातात सोपवण्याचा कट आखला आहे. आज सकाळीच राहुल गांधी यांनी ट्विटरवर या बजेटकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर तीन मुद्दे टाकले होते. MSME ला पाठिंबा, शेतकरी आणि कामगारांसाठी रोजगार हवा. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य क्षेत्रावर अधिक तरतूद व्हायला हवी. सीमेच्या सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रावरील खर्चामध्ये वाढ करण्यात यायला हवी. 

हेही वाचा - Budget 2021 : देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात सोपवण्याचा कट; राहुल गांधींची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी देखील या बजेटवर  खोचक अशी टीका केली आहे. त्यांनी एका उदाहरणाद्वारे हे बजेट पोकळ असल्याचं दाखवून दिलंय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजप सरकारने मला एका गॅरेज मेकॅनिकची आठवण करुन दिली आहे. जो गॅरेज मेकॅनिक आपल्या ग्राहकांना  म्हणतो की, मी तुमच्या गाडीचे बिघडलेले ब्रेक्स दुरुस्त करु शकत नाही, म्हणून मी तुमच्या गाडीचा हॉर्न अधिक मोठा आवाज करेल अशापद्धतीने दुरुस्त करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget updates Mamata Banerjee reaction anti people budget