सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दिवसा 10 तास वीज; जिल्ह्यातील पहिल्याच केंद्राचा 2 हजार शेतकऱ्यांना लाभ

योगेश सोनवणे
Saturday, 17 October 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील दहिवड उपकेंद्रातील 5 वीज वाहिन्यावरील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते.

नाशिक/दहीवड : देवळा तालुक्यातील दहीवड फिडरवरील दोन हजार वीजपंप ग्राहकांना 2 आक्टोबर पासून सौर ऊर्जा प्रकल्पावरून दिवसा 10 तास वीजपुरवठा कार्यान्वयित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाच प्रकल्पातील हा पहिला प्रकल्प आहे.

रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी 2018 पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा 10 तास  वीज देण्याच्या उपक्रमातून दहीवड फिडरवरील दोन हजार ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील दहिवड उपकेंद्रातील 5 वीज वाहिन्यावरील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

शेतकऱ्यांना 1 रुपये 60 पैसे या दराने वीज

पारंपरिक ऊर्जा स्रोतांशिवाय अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी राज्यसरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली होती. नाशिक जिल्ह्यात बागलाण,  मालेगाव, नांदगाव, येवला व देवळा तालुक्यात दहीवड केंद्राला लागून अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. देवळा तालुक्यातील  प्रकल्प नुकताच सुरु करून या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सदर योजना यशस्वी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याकरिता वरील उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन उर्जा मंत्रालयाने दिले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपये 60 पैसे या दराने वीज उपलब्ध होणार आहे. देवळा तालुक्यातील दहीवड येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा 'महावितरण' तर्फे कार्यान्वयीत केलेला जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 hours power from solar power project nashik marathi news