Corona Updates :जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार १८७ पॉझिटिव्‍ह; बरे झाले ७७० रुग्‍ण

अरुण मलाणी
Sunday, 13 September 2020

रविवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७४७, नाशिक ग्रामीणचे ३९५, मालेगावचे ३४, तर जिल्‍हाबाह्य अकरा रुग्‍णांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ५१६ वर पोचली आहे.

नाशिक : गेल्‍या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पंधराशेहून अधिक कोरोनाबाधित आढळत असताना, रविवारी (ता. १३) मात्र रुग्‍णसंख्येत काहीशी घट होऊन दिवसभरात एक हजार १८७ नवीन रुग्ण आढळले. तर ७७० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आणि चौदा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्‍णसंख्येत ४०३ ने भर पडली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दहा हजार ८१८ बाधित उपचार घेत आहेत. 

रविवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७४७, नाशिक ग्रामीणचे ३९५, मालेगावचे ३४, तर जिल्‍हाबाह्य अकरा रुग्‍णांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ५१६ वर पोचली आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५५२, नाशिक ग्रामीणचे १७९, मालेगावचे ३६, जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍णांचा समावेश आहे. तर चौदा मृतांमध्ये नाशिक शहरातील पाच, ग्रामीणचे सहा, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाह्य एक रुग्ण आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

४३३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित

दरम्‍यान, सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ४३३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ८३३ अहवाल ग्रामीण भागातील रुग्‍णांचे आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९२५, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात १२४, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३८, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा, जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयित दाखल झाले आहेत. 
 
मालेगावला पुन्हा ६० रुग्ण 

मालेगाव : शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत ६० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कॅम्प-संगमेश्‍वरचा पश्‍चिम भाग व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचा यात समावेश आहे. शहरात गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांसह एकूण रुग्णांची संख्या ६८९ झाली आहे. अद्याप ३१६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण तीन हजार १५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील दोन हजार ३९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १२६ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात दाभाडी, रावळगाव, झोडगे, अजंग, वडेल, वडनेर खाकुर्डी या मोठ्या गावांमध्ये वेळोवेळी जनता कर्फ्यू पाळूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 
 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

देवळ्यातही ११ जणांना लागण 

देवळा : तालुक्यात रविवारी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सहा रुग्ण देवळा येथील, तर दहिवडचे दोन व झिरेपिंपळ येथील तिघांचा समावेश आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी ही माहिती दिली. तालुक्यात आतापर्यंत ४५८ रुग्ण आढळले असून, त्यातील ३८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या येथील कोविड सेंटरमध्ये १२, तर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात सात रुग्णांवर व खासगी रुग्णालयांमध्ये १४ रुग्ण उपचार घेत आहेत. एक रुग्ण अभोणा (ता. कळवण) कोविड सेंटरमध्ये दाखल आहे. घरीच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २९ असून, आतापर्यंत आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात एकूण ७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील सर्वाधिक २२ रुग्ण देवळा नगर पंचायत हद्दीतील व त्या खालोखाल १८ रुग्ण उमराणे येथील आहेत. 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1187 new corona patients found in nashik district marathi news