जिल्‍ह्यात दिवसभरात कोरोनाचे दोनशे बाधित, तर १८५ रूग्‍ण बरे

अरुण मलाणी
Tuesday, 10 November 2020

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५०, नाशिक ग्रामीणचे ३९, मालेगावचे सहा तर जिल्‍हाबाह्य पाच कोरोना बाधित आढळले आहेत.

नाशिक : अनेक दिवसांनंतर मंगळवारी (ता.१०) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ही कोरोनामुक्‍त झालेल्‍यांपेक्षा अधिक राहिली. दिवसभरात दोनशे कोरोना बाधित आढळले तर १८५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत अकराने वाढ झाली असून सद्य स्‍थितीत २ हजार ८१२ रूग्‍ण उपचार घेत आहेत. 

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५०, नाशिक ग्रामीणचे ३९, मालेगावचे सहा तर जिल्‍हाबाह्य पाच कोरोना बाधित आढळले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील १६५, नाशिक ग्रामीणचे १५, मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाह्य दोन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चार मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील दोन तर नाशिक ग्रामीणमधून दोन रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९५ हजार ९४४ झाली असून, यापैकी ९१ हजार ४२१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ७११ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५७९, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन, जिल्‍हा रूग्‍णालयात तीन रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरा ६७५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणचे ३५४, नाशिक शहरातील २८५ अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 corona patientds found in a nashik district marathi news