जिल्ह्यात १५४ दिवसांनंतर दिवसभरात एकही बळी नाही; ४१८ रूग्‍णांची कोरोनावर मात 

अरुण मलाणी
Sunday, 1 November 2020

यापूर्वी ३० मेस दिवसभरात एकाही रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला नसल्‍याची नोंद होती. दरम्‍यान दिवसभरात २४४ बाधित आढळून आले तर ४१८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 

नाशिक : गेल्‍या अनेक दिवसांपासून जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूंचे प्रमाणही वाढत होते. दिवसभरात मृत्‍यूंची संख्या तीसपर्यंतदेखील पोहोचली होती. मात्र रविवारी (ता.१) तब्‍बल १५४ दिवसांनंतर जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे एकाही रूग्‍णाचा दिवसभरात मृत्‍यू झाला नाही. यापूर्वी ३० मेस दिवसभरात एकाही रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला नसल्‍याची नोंद होती. दरम्‍यान दिवसभरात २४४ बाधित आढळून आले तर ४१८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये निच्चांकी रूग्‍ण

कोरोनाचा फैलाव जिल्‍ह्‍यात होत असतांना आतापर्यंत उपचार घेणार्या १ हजार ६७० रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. मे महिन्‍यात २९ मेपर्यंत ७१ रूग्‍णांनी कोरोनामुळे जीव गमावला होता. यानंतर ३० मेस एकाही रूग्‍णाचा मृत्‍यू झाला नव्‍हता. या दिवसानंतर सातत्‍याने मृतांचा आकडा वाढत होता. गेल्‍या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या घटत असतांना ऑक्‍टोबरमध्ये निच्चांकी रूग्‍ण आढळले होते. जिल्‍हावासियांसाठी रविवार (ता.१) आणखी दिलासा देणारा दिवस ठरला. दिवसभरात एकही रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात मृत्‍यू झाला नसल्‍याची नोंद जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेने जारी केली आहे. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

दरम्‍यान रविवारी दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५४, नाशिक ग्रामीणचे ८४, मालेगावचे ४ तर जिल्‍हाबाह्य दोन बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २४९, नाशिक ग्रामीणचे १६४, मालेगावचे दोन तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून जिल्‍हाभरात आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ९३ हजार ९१५ झाली असून, यापैकी ८८ हजार ४२४ रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. 
दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८५४ रूग्‍ण, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ११, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात ९, जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

जिल्‍ह्‍याचा मृत्‍यूदर १.७८ टक्‍के 
जिल्‍ह्‍यात आतापर्यंत १ हजार ६७० रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, मृत्‍यूदर १.७८ इतका आहे. आतापर्यंतच्‍या मृत्‍यूंपैकी ५९९ मृत्‍यू नाशिक ग्रामीणचे, ८६७ मृत्‍यू नाशिक महापालिका हद्दीतील, मालेगाव महापालिका हद्दीतील १६६ तर जिल्‍हाबाह्य ३८ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 418 patients overcome corona in nashik marathi news