नाशिकमध्ये मोबाईल अभावी ४५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित 

online education
online education

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शाळा बंद असल्या तरी, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थांचा आहे. परंतू, महापालिकेच्या शाळांमधील साडे चार हजार विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पाल्यांसाठी ॲण्ड्राईड मोबाईल घेणे त्यांना शक्य नाही. परिणामी, गेल्या सात महिन्यांपासून असे जवळपास साडेचार हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

 हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

कोरोना प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जुनपासून शासनाने अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी ‘पुनश्‍च हरिओम’चा नारा दिला. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु झाली. मात्र, अद्यापही शैक्षणिक संस्था सुरु झाल्या नाहीत. परंतू जुनपासून सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून खासगी शिक्षण संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देताना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थ्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक महापालिकेने देखील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबिला. त्यानुसार ऑगष्टमध्ये विद्यार्थ्यांना झुम मिटींग, पर्यायी प्रश्‍नमालिका सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने लिंक तयार करून पालकांना पाठविली होती. परंतू साडे चार हजार विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पोचली नाही. शिक्षकांच्या माध्यमातून चौकशी केल्यानंतर या विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाईल नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. पालकांना ॲण्ड्रॉईड मोबाईल देण्याची तरतुद नसल्याने किंवा प्रशासकीय मान्यता मिळविण्यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोचवून स्वाध्याय पत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्याने काही प्रमाणात शिक्षणाची अडचण दुर झाली तरी ॲण्ड्राईड मोबाईल असलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती नाजूक असलेले विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचतं नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. 

सर्वेक्षणामुळे शिकवणे बंद 

साडे चार हजार विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर येत असताना दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन द्वारे शिक्षण दिले जात होते. ते देखील गेल्या महिनाभरापासून शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. याचाचं अर्थ आता सर्वचं म्हणजे २७ हजार ७३७ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने पन्नास वयाच्या आतील ७३५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. सर्वेक्षण करताना शिक्षणार्जनाचे कर्तव्यही पार पाडण्याच्या सुचना असताना दोन्ही कामे एकाचं वेळी शक्य नसल्याने शिक्षकांनी शिक्षणाचे कार्य बंद करून फक्त सर्वेक्षणावर लक्ष केंद्रीत केल्याचा हा परिणाम आहे. 

ॲण्ड्रॉईड मोबाईल अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होवू देणार नाही. महापालिका व एनजीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल व डेटा पॅक उपलब्ध करून दिला जाईल. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका. 
 
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापुर्वीचं प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू अंमलबजावणी झाली नाही. आता नव्याने प्रस्ताव देवू. 
-संगिता गायकवाड, सभापती, शिक्षण समिती. 

ॲण्ड्राईड मोबाईलद्वारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतं असल्याची बाब खरी असली तरी स्वाध्याय पत्रिकेच्या माध्यमातून शिक्षकांनी शिक्षण पोहोचविले आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यासाठी एक एनजीओ तयार असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. 
-सुनिता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com