esakal | जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्रे; शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

-Bajra-(Millet).jpg

बाजरी पिकाची सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन नोंद, ८ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे. 

जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्रे; शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक : (येवला) जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजार रुपयांचा लाभ होणार आहे. 

माणिकराव शिंदेंच्या मागणीला, भुजबळांच्या पाठपुराव्याला यश 

शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत आधारभूत किंमत दोन हजार १५० रुपये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचा होणारा तोटा दूर करत न्याय द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी केली होती. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून येवलासह सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पाठपुरावा करत मंजूर करून घेतला. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय बाजरी खरेदी केंदासाठी येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची नेमणूक केली आहे.

अन् पिकांचा उत्पादनखर्चही निघणार नाही

१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन हजार १५० रुपये प्रतिक्विंटल दराने शासकीय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले यांनी दिली. तालुक्यात आठ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून, शुक्रवारी (ता. १६) १,१०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत असून, कवडीमोल भावात बाजरीच्या पिकांचा उत्पादनखर्चही निघणार नाही. 

बाजरी उत्पादकांनी नोंदणीसाठी संपर्क करा

बाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रतिक्विंटल १,१०० रुपये नुकसानीस आज शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. मात्र, केंद्र मंजुरीमुळे २० कोटी रुपयांचा फायदा तालुक्यातील बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, शासकीय बाजरी ऑनलाइन नोंदणी १ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन नोंद, ८ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

सध्याचे बाजारभाव व शासकीय हमीभावात हजार रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजरी खरेदी सुरू करणे आवश्यक होते. येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरीहिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व मका ७५ ते ८० क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी, ही अपेक्षा. - ॲड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!