अतिवृष्टीने बाधित 700 हेक्टरवरील शेती पिकांचे पंचनामे सुरू; ग्रामस्तरीय समिती नियुक्त

अजित देसाई 
Friday, 2 October 2020

चोवीस तासात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. तालुक्यात यंदाच्या हंगामात बहुतांश भागात पर्जन्यमान अधिक राहिल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

अतिवृष्टीने बाधित 700 हेक्टरवरील शेती पिकांचे पंचनामे सुरू
ग्रामस्तरीय समितीमार्फत 33% पेक्षा अधिक नुकसानीचे होणार पंचनामे

नाशिक : (सिन्नर) तालुक्यात यंदा मान्सूनची कृपादृष्टी असली तरी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला गेल्याने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून तालुक्यातील 700 हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची ग्रामस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

700 हेक्टर क्षेत्र बाधित

चोवीस तासात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. तालुक्यात यंदाच्या हंगामात बहुतांश भागात पर्जन्यमान अधिक राहिल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. शासन स्तरावरून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित झाल्यानंतर तालुक्यात 700 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे अनुमान वर्तविण्यात आले. आता संयुक्त पंचनामा करून हे नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालक अधिकाऱ्यांची ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तालुक्यातील 33 गावांमध्ये हे पंचनामे करण्यात येणार आहेत.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

असे होतील पंचनामे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेशी संबंधित अभिलेख तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीकडे पाठवण्यात येतील. तर विमा न काढलेल्या मात्र 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे व घोषवारा तलाठीमार्फत तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. 
नुकसानीचे पंचनामे करताना शेतजमीन व पिकांचे सर्वे नंबर/गट नंबर दाखवणे, सातबारामध्ये नोंद नमूद केलेल्या क्षेत्राप्रमाणे आपदग्रस्त क्षेत्र जुळविण्याची जबाबदारी तलाठ्यावर असणार आहे. नुकसान झालेल्या पिकाचे जीपीएस एनेबल्ड फोटो मोबाईलवर काढून ते शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम ग्रामसेवकास करावे लागणार आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नुकसानीची टक्केवारी ठरवण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. निवासी नायब तहसीलदार दत्ता जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी चित्ते, कृषी पर्यवेक्षक दिलीप डेंगळे यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हलगर्जीपणा केल्यास कारवाई...

या कामात हलगर्जीपणा केल्यास, तसेच चुकीचे पंचनामे केल्यास संबंधित पालक अधिकाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील)1979 अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

पंचनामे करण्यात येणार असलेली गावे

दातली, मुसळगाव, कुंदेवाडी, गुळवंच, ठाणगाव, आशापुर, पाडळी, हिवरे, पिंपळे, सोनारी, कृष्णनगर, डुबेरे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, नांदुरशिंगोटे, दोडी बुद्रुक व खुर्द, दापुर, गोंदे, शिवाजीनगर, दत्तनगर, पाटोळे, धोंडवीरनगर, कोळगाव माळ, पिंपरवाडी, वावी, मिरगाव, शहा, पाथरे खुर्द व बुद्रुक, वारेगाव या गावांमध्ये सदर पंचनामे करण्यात येणार आहेत.  

 संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 700 hectares of crops affected by heavy rains in sinnar nashik marathi news