VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Thursday, 30 July 2020

एका बाजूला बेडच उपलब्ध होत नाही, असा डांगोरा पिटला जात असताना या आयत्या बेडचा वापरच जनतेसाठी झाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनाला व वैद्यकीय विभागाला ही करता आला नाही. या रिकामे असलेल्या आयसोलेशन कोचेस केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पळविण्यात आल्या. 

नाशिक : भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर 79 आयसोलेशन कोचेस तयार केल्या होत्या. या कोचेसचा फायदा रुग्णांना झालाच नाही. मात्र वैद्यकीयदृष्ट्या सक्षम केलेल्या या कोचेस केवळ एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावरच फिरवण्यात आल्या. बेड नसल्याचा डांगोरा पिटला जात असतानाच या आयत्या बेडचा वापर रेल्वेस्थानकाच्या आसपासच्या स्थानिक व्यवस्थापनाला करता आला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

79 आयसोलेशन कोचेस धूळ खात पडलेल्या

भुसावळ विभागाअंतर्गत 79 आयसोलेशन कोचेस तयार करण्यात आल्या होत्या. एका कोचमध्ये सोळा रुग्ण सोशल डिस्टंन्स ठेवून राहू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यात वैद्यकीय पथकालाही जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र या कोचेसचा उपयोग रेल्वेस्थानकाच्या जवळ असणाऱ्या गावांना त्याचप्रमाणे स्थानिक व्यवस्थापनाला व रेल्वे विभागाला करता आला नाही. एका बाजूला बेडच उपलब्ध होत नाही, असा डांगोरा पिटला जात असताना या आयत्या बेडचा वापरच जनतेसाठी झाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनाला व वैद्यकीय विभागाला ही करता आला नाही. या रिकामे असलेल्या आयसोलेशन कोचेस केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पळविण्यात आल्या. 

सोशल ऑडिटिंग करायला हवे

बेड मिळत नसलेल्या रुग्णांना या कॉचेसमध्ये आयसीयूबरोबरच क्वारंटाइन सुविधा उपलब्ध होत्या. उच्च दर्जाच्या सुविधा या कोचेसमध्ये नागरिकांना मिळू शकले असते. मात्र रेल्वे विभाग व स्थानिक वैद्यकीय व्यवस्थापनाने तसे केले नाही. महसूल रूपाने लोकांचा खिशातला पैसा पाण्यासारखा या कोचवर खर्च झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याचे सोशल ऑडिटिंग करायला हवे अशी भूमिका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा > घरखर्च भागविण्यासाठी वडिलांसोबत लावले पिको-फॉल...भाग्यश्रीच्या यशाने आईच्या कष्टाला कोंदण! 

मात्र प्रशासनाचे दुर्लक्षच

भुसावळ विभागाअंतर्गत बडनेरा, अकोला, भुसावळ, देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, चाळीसगाव अशी मुख्य स्थानके येतात. याठिकाणी या आयसोलेशन कोचेसचा लाभ नागरिकांसाठी मिळायला पाहिजे होता, मात्र तसे काही झाले नाही. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण वाढत असून सुविधा मिळत नाही असे जनमत तयार होत आहे. या आयत्या बेडचा वापरच प्रशासनाला करता आला नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 79 Isolation Coaches manufactured under Bhusawal Division are not in use nashik marathi news