एकीकडे रूग्ण वाढत असताना..दुसरीकडे ८७३ अहवाल प्रलंबीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे प्रलंबित अहवालांची संख्याही धडकी भरविणारी आहे. मंगळवारी (ता. 7) सायंकाळपर्यंत तब्बल 873 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे नऊ रुग्ण दगावले.​

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे प्रलंबित अहवालांची संख्याही धडकी भरविणारी आहे. मंगळवारी (ता. 7) सायंकाळपर्यंत तब्बल 873 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे नऊ रुग्ण दगावले. यात नाशिक शहरातील सहा, तर विंचूरदळवी (ता. सिन्नर), तळेगाव (ता. दिंडोरी) व येवला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तसेच दिवसभरात 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाच हजार 796 झाली आहे. 

परदेशीपुरा येथील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू
मंगळवारी कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांमध्ये नाशिक रोड येथील 54 वर्षीय महिला, पंचवटीच्या तारवालानगरमधील 60 वर्षीय पुरुष, इंद्रकुंड परिसरातील 69 वर्षीय महिला, जुने नाशिकच्या मदिना चौकातील 74 वर्षीय महिला आणि देवळालीगावातील 74 व 60 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच विंचूरदळवी येथील 65 वर्षीय पुरुष, तळेगाव येथील 45 वर्षीय महिला आणि येवल्यात परदेशीपुरा येथील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 293 झाली. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील 143, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 76, ग्रामीण भागातील 61, तर अन्य जिल्ह्यांतील 13 मृत्यू समाविष्ट आहेत. 

नव्याने 619 जण दाखल 
दरम्यान, जिल्हाभरातील विविध कोविड सेंटरमध्ये मंगळवारी 619 संशयित रुग्ण दाखल झाले. यात जिल्हा रुग्णालयात 16, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांत 346, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 11, मालेगाव महापालिका रुग्णालयात 10, तर उर्वरित जिल्ह्यात 236 संशयित रुग्ण आहेत. विविध प्रयोगशाळांकडे जिल्ह्यातील 873 संशयित रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यात, नाशिक महापालिका क्षेत्रातील 245, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 193, तर उर्वरित ग्रामीण भागातील 435 स्वॅबचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक प्रयोगशाळांची उपलब्धता असतानाही मोठ्या प्रमाणात रिपोर्ट प्रलंबित राहत आहेत. 
 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

शहरात सर्वाधिक 119 रुग्ण

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 133 अहवाल पॉझिटिव्ह आले. यात नाशिक शहरात सर्वाधिक 119 रुग्ण असून, उर्वरित जिल्ह्यात 13 आणि परभणीतील एका रुग्णाचा समावेश आहे. नाशिक रोड परिसरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणीय भर पडली असून, गोसावीवाडी, धोंगडे मळा, विहितगाव, जयभवानी रोड, दसक, जेल रोड, देवळाली गाव, गुलाबवाडी परिसरात रुग्ण वाढले आहेत. पंचवटीतही रामनगर, दत्तनगर, दिंडोरी रोड, शनिमंदिर, मखमलाबाद, मेरी, पेठ रोड या परिसर, तसेच शहरात कॅनडा कॉर्नर, द्वारका, जुने नाशिक, इंदिरानगर, सातपूर, सिडकोतील उपेंद्रनगर, उत्तमनगर, वडाळागाव या परिसरात रुग्ण वाढले आहेत. याशिवाय, जिल्ह्यात चांदसी, गिरणारे, उमराणे (ता. देवळा), लासलगाव, दहिवेवारे, देवळाली कॅम्प, चांदवड, सटाणा, घोटी येथे रुग्ण वाढले असून, एक रुग्ण परभणी येथील आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 873 reports pending as patient grows nashik marathi news