महिला तलाठीला शिवीगाळ व दमदाटी; तलाठी संघटनेचा कामबंदचा इशारा 

संतोष विंचू
Friday, 9 October 2020

पंचनामा करणार नसल्याने मालिक यांना राग येताच त्यांनी तलाठी शेंडे यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न करत मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर..

येवला (जि. नाशिक) : शेतात पंचनामा करण्याच्या वादातून महिला तलाठ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना बोकटे येथे घडली. याप्रकरणी किरण दाभाडे व महेश मलिक या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नुकसानीचे पंचनामे करत असताना घडला प्रकार

बोकटे (ता. येवला) येथील तलाठी अश्विनी शेंडे अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना बोकटे गावातील महेश मलिक यांच्या क्षेत्रात पाहणी करत असताना संबंधित क्षेत्र खुले दिसून आले. तसेच शेतात कुठल्याही प्रकारे पाणी साचलेले दिसले नाही. वस्तुनिष्ठ पाहणीदरम्यान या क्षेत्रात कुठलेही नुकसान झाले नसल्याचे तलाठी शेंडे यांनी पंचनामा करणे योग्य ठरणार नसल्याचे स्थानिक पोलीस पाटील यांच्यासमक्ष महेश मलिक यांना सांगितले.

मारहाण करण्याची धमकी

पंचनामा करणार नसल्याने मालिक यांना राग येताच त्यांनी तलाठी शेंडे यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न करत मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर किरण दाभाडे यांच्या क्षेत्रात पंचनामा करीत असताना वस्तुस्थितीपेक्षा जास्त नुकसान दाखवण्याची मागणी किरण दाभाडे यांनी केली. तसे न केल्यास जागेवर मारहाण करण्याची धमकी तलाठी शेंडे यांना दिली. दोन्ही घटनांबाबत तलाठी अश्विनी शेंडे यांनी येवला तालुका पोलिस ठाण्यात किरण दाभाडे व महेश मलिक या दोघांविरोधात फिर्याद दिल्यावरून संबंधितांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

तलाठी संघटनेचा कामबंदचा इशारा 
या घटनेतील आरोपीवर कारवाईसाठी आता तलाठी संघ आक्रमक झाला असून, तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देऊन संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करावी; अन्यथा कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. निवेदनावर अध्यक्ष व्ही. डी. शिंदे, सरचिटणीस ए. एस. भोसले, एस. एस. काकड, बी. एम. घोडके, पी. एस. चोपडे, एस. आर. जोपळे, बी. एस. औंधकर, आर. के. खैरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abusing women talathi at bokate nashik marathi news