नाशिक विभागातील चार अपर जिल्हाधिकाऱ्यांना 'आयएएस'पदी पदोन्नती!

विनोद बेदरकर
Friday, 4 September 2020

केंद्र सरकारची अधिसूचना गुरुवारी (ता. ३) प्रसिद्ध झाली. त्यात नाशिक विभागातील उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी यांच्यासह शिर्डी येथील मुख्याधिकारी कान्हुराज बगाटे यांचा समावेश आहे.

नाशिक : राज्यात २३ अपर जिल्हाधिकाऱ्यांना केंद्र सरकारने आयएएसपदी पदोन्नती दिली आहे. भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारची अधिसूचना गुरुवारी (ता. ३) प्रसिद्ध झाली. त्यात नाशिक विभागातील उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी यांच्यासह शिर्डी येथील मुख्याधिकारी कान्हुराज बगाटे यांचा समावेश आहे.

नाशिक विभागातील चौघांना आयएएसपदी पदोन्नती

कान्हुराज बगाटे नाशिकला अपर जिल्हाधिकारी होते. सातारा येथे प्रांताधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त, मुंबई-पुणे महामार्ग भूसंपादन अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विमानतळ विकास कंपनी, सरदार सरोवर, रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर सध्या शिर्डी येथे मुख्याधिकारी आहेत. अमेरिकेत त्यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले आहे. नाशिकला काही काळ अपर जिल्हाधिकारी होते. विभागीय महसूल कार्यालयातील उपायुक्त दिलीप स्वामी यांनी अमरावतीला उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, दर्यापूर, अमरावती येथे उपविभागीय अधिकारी, पुसद आणि त्यानंतर नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी म्हणून विमुक्त जाती-जमाती इतर मागास विभागात सहसंचालक, नांदेडला अपर जिल्हाधिकारी त्यानंतर मालेगावला अपर जिल्हाधिकारी, नाशिकला प्रभारी अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या विभागीय आयुक्तालयात आहेत. 

कुंभमेळ्यासाठी यांचे योगदान मोलाचेच

रघुनाथ गावडे विभागीय महसूल कार्यालयात उपायुक्त आहेत. नाशिकला त्यांनी काम पाहिले आहे. ते नाशिकमध्ये परिचित अधिकारी आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात त्यांनी काम केले आहे. सिंहस्थ कक्षाचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आखाड्यासाठीच्या भूसंपादनापासून तर विविध विभागात समन्वय साधून स्वच्छ कुंभमेळ्यासाठी शहरातील दोनशेवर सामाजिक संस्था एकत्रित करून स्वच्छ कुंभमेळ्यासाठी त्यांचे योगदान राहिले आहे. प्रवीण पुरी विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा उपायुक्त आहेत. त्यांनी कोकण, ठाणे, नाशिक अशा राज्यातील विविध विभागांत काम केले आहे. ठाणे येथे प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, अमरावती अशा विविध भागांत भूसंपादन, महसूल, पुरवठा अशा महसूल विभागातील जवळपास सगळ्या विभागात कामकाज केले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

इतर अधिकारी असे 

राज्यात यू. ए. जाधव, विजयकुमार पंढरीनाथ फड, भाऊसाहेब बन्सी दांडगे, किसन नारायणराव जावळे, श्‍यामसुंदर लीलाधर पाटील, संजय रामराव चव्हाण, साळीमठ, किशोर सदाशिव तावडे, प्रमोद बबनराव यादव, कविता द्विवेदी, सुधाकर बापूराव तेलंग, मंगेश वसंत मोहिते, शिवानंद त्र्यंबक टाकसाळे, राजेंद्र शंकर क्षीरसागर, विनय मून, प्रदीपकुमार डांगे, वर्षा दामोदर ठाकूर, डॉ. अनिल गणपतराव रामोद, सी. डी. जोशी.  

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional Collector Bagate, Swami, Gawde, Puri promoted to IAS nashik marathi news