अमरधाममध्ये ४५ दिवसांत अतिरिक्त विद्युतदाहिनी; स्मार्टसिटी कंपनीचा निर्णय

electric cremation.jpg
electric cremation.jpg

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मृत्यूदर वाढत आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांवर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. मृतदेहांची वाढती गर्दी लक्षात घेता तेथे गर्दी होत असल्याने नाशिक अमरधाममध्ये उपलब्ध असलेल्या स्ट्रक्चरवर अतिरिक्त विद्युतदाहिनी ४५ दिवसांत बसविण्याचा निर्णय स्मार्टसिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

स्मार्टसिटी कंपनीच्या बैठकीत निर्णय 

कंपनीच्या संचालकांची बैठक शुक्रवारी (ता. २४) महापालिका मुख्यालयात झाली. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, आयुक्त राधाकृष्ण गमे, संचालक महापौर सतीश कुलकर्णी, शाहू खैरै, गुरुमित बग्गा, सतीश सोनवणे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल उपस्थित होते. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत असल्याने अतिरिक्त विद्युतदाहिनी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवटी अमरधाममध्येही विद्युतदाहिनी बसविण्याची मागणी संचालक शाहू खैरे व गुरुमित बग्गा यांनी केली. परंतु नाशिक अमरधाममध्ये स्ट्रक्चर उपलब्ध असल्याने तूर्त त्यावर ४५ दिवसांत विद्युतदाहिनी बसविली जाईल. पंचवटीमध्ये महापालिकेच्या बजेटमधून तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. स्मार्टसिटी कंपनीच्या स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमातून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

रामकुंडात इंद्रकुंडातूनच पाणी 

रामकुंडात स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. येथील पाणी प्रदूषित असल्याने थेट गंगापूर धरणातून वाहिनीद्वारे पाणी आणण्याचा स्मार्टसिटीच्या द्रविडी प्राणायमाला खैरे, बग्गा यांनी विरोध दर्शवत मालेगाव स्टॅन्ड येथे नव्याने तयार होणाया फिल्टरेशन प्लान्टमधील जलकुंभातून पाणी घेण्याचे सुचवत कोट्यवधींचा खर्च वाचविला. स्मार्ट रस्त्याच्या कामाला विलंब झाल्याने ठेकेदारावर लावण्यात आलेला दंड परस्पर माफ केल्याने पुढील बैठकीत माहिती देण्याच्या सूचना श्री. कुंटे यांनी केल्या. 

सरस्वती नाल्यासाठी बैठक 

दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या सराफ बाजारातील सरस्वती नाल्याचे काम करताना नाल्यावरील अतिक्रमणे, नाल्याची खोली मोजणे, ड्रेनेज व पावसाळी पाण्याची स्वतंत्र लाइन टाकण्याचा सल्ला खैरे यांनी दिला. महापालिकेचे व स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे ठरले. डब्यात गेलेला सायकल शेअरिंग उपक्रम पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com