नवीन स्थायीत शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा लागणार; वकिलांचा महापालिकेला कायदेशीर सल्ला

विक्रांत मते
Monday, 8 February 2021

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार स्थायी समितीमध्ये भाजपच्या नऊऐवजी आठ सदस्यांची नियुक्ती करून शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा लागणार आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार स्थायी समितीमध्ये भाजपच्या नऊऐवजी आठ सदस्यांची नियुक्ती करून शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा लागणार आहे. उच्च न्यायालयातील महापालिकेचे वकील ॲड. एम. एल. पाटील यांच्याकडून महापालिका प्रशासनाला कायदेशीर सल्ला प्राप्त झाला. त्यानुसार फेब्रुवारीअखेर निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य नियुक्ती केली जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

काय आहे संपुर्ण  प्रकरण?

महापालिकेत भाजपचे सदस्य बळ दोनने घटल्याने तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला व तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समितीत शिवसेनेचे चारऐवजी पाच सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, महासभेत महापौर कुलकर्णी यांनी शिवसेनेची मागणी डावलून फेब्रुवारी २०२० मध्ये भाजपच्या नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याने त्या विरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जानेवारी महिन्यात उच्च न्यायालयाने त्यावर निकाल देताना तौलनिक संख्या बळानुसार शिवसेनेच्या एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, विद्यमान स्थायी समितीची मुदत संपण्यास अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना, नवीन सदस्यांची नियुक्ती या वर्षात करायची, की नव्या स्थायी समितीचे गठण करताना अतिरिक्त एका सदस्यच्या नियुक्तीवरून पेच निर्माण झाला होता. न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून कायदेशील सल्ला मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ॲड. एम. एल. पाटील, ॲड. संदीप मारणे यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यात तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. २८ जानेवारी २०२० च्या महासभेत महापौरांनी भाजपचा नववा सदस्यही घोषित केला. त्यामुळे स्थायी समितीचे पुनर्गठण करणे आवश्यक असून, भाजपचा अतिरीक्त नेमलेला एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक अधिक सदस्य नियुक्त करणे गरजेचे आहे. सध्या स्थायी समितीचा अल्प कालावधी शिल्लक राहिल्याने नव्या स्थायी समितीसाठी शिवसेनेचा पाचवा सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

कायदेशीर सल्ल्यानुसार फेब्रुवारीअखेर आठ नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात शिवसेनेच्या पाचव्या सदस्याची नियुक्ती केली जाईल. 
-सतीश कुलकर्णी, महापौर 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An additional post for Shiv Sena in the new standing committee nashik nmc news