अधिकमासात लाडक्या जावईबापूंच्या वाणाचे बदलले स्वरूप! तांब्याची भांडी व तेहेतीस पदार्थांना महत्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला 'धोंडा' असेही म्हणतात. त्यामुळे यंदा जावईबापूंसाठी सुगीचा महिना येणार आहे. विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल होणार आहे.अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. कालौघात वाणाच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झाला असला तरी अद्यापही ही परंपरा टिकून असल्याचे दिसून येते. 

नाशिक / पंचवटी : अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला 'धोंडा' असेही म्हणतात. त्यामुळे यंदा जावईबापूंसाठी सुगीचा महिना येणार आहे. विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल होणार आहे.अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. कालौघात वाणाच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झाला असला तरी अद्यापही ही परंपरा टिकून असल्याचे दिसून येते. शुक्रवार (ता. १८) पासून अधिकमासाला सुरवात झाली.

पक्वान्ने ३३ या संख्येने दान

या महिन्यातील देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू मानले असून त्यांच्या कृपेसाठी पुढील विधी करण्यास सांगितले आहेत. पापक्षालनासाठी मलमास व्रत, प्रत्येक दिवशी अनारसे आदी पक्वान्ने ३३ या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह द्यायचे असते. महाराष्ट्रात अधिकमासात अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या जावायास लक्ष्मी-नारायणस्वरूप मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी. त्यात जावईबापूंना कपडे, दागिने, भांडी स्वरुपात वस्तू भेट दिल्या जातात. पंचपक्वान्न गोड-धोडच्या जेवणावळी होतात. जी कर्मे अन्यवेळी करणे शक्य असेल, ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत.

अधिक मास म्हणजे काय?

हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो, परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात, असे पांडव यांनी सांगितले.

तांबे-पितळीच्या भांड्यांना अधिकमासात महत्त्व

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात जावयांना सुग्रास भोजनासह कपडे, तांब्याची भांडी, अनारसे, बत्तासे असे सछिद्र असलेले पदार्थ देण्याची पद्धत आहे. या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा ग्रामीण भागात ‘धोंड्याचा महिना’ असेही संबोधले जाते. यात जावईबापूंना घरी बोलावून गोडधोड जेवणासह शर्ट-पॅन्टपीस, साड्यांना प्राधान्य देतात. याशिवाय तांब्याची भांडी, निरंजन, तांब्याचे घंगाळे, कळशी, तबक, गडवे देण्याची पद्धत आहे. अधिकामासाच्या या प्रथेमुळे सध्या कोरोनामुळे मरगळ आलेल्या बाजारात तांब्याची भांडी घेण्यासाठी चैतन्य आले आहे. विशेष म्हणजे या सगळ्यात नाशिकची पारंपरिक ओळख असलेल्या तांबे-पितळीच्या भांड्यांना अधिकमासात महत्त्व आले आहे. तयार खाद्यपदार्थांचा व्यवसाय फुलत आहे. शुक्रवार (ता. १८) पासून अधिकमासाला सुरवात झाली.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

तेहेतीसच पदार्थ का? 

अधिकमासात जावयाला तांब्याच्या भांड्यांसह अनारसे, बत्तासे देतात. इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असले, तरी मराठी वर्ष ३५६ दिवसांचे असते. या हिशेबाने प्रत्येक महिन्यातील ११ दिवसांचा फरक गृहित धरून तीन महिन्यांचे ३३ दिवस होतात. त्यामुळे ३३ अनारसे, बत्तासे दानाची प्रथा आहे. त्यासाठी बाजारात १३० ते १५० रुपयांपर्यंत अनारसे उपलब्ध आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

बदलत्या काळात वाण देण्याची परंपरा टिकून आहे. यंदा वाणासाठी आकर्षक आकारातील ग्लासासह तांब्याचे आकर्षक जग विक्रीसाठी आले असून, त्याला मोठी मागणी आहे. 
- राजेश आंबेकर, विक्रेते 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adhik mas importance nashik marathi news