पहिल्याच दिवशी 'इतक्‍या' प्रवाशांकडून लालपरी की सवारी...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

नाशिक जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका वगळता उर्वरित जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट केला होता. त्यामुळे या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळातर्फे बससेवेला सुरवात झाली आहे. 

नाशिक : राज्य शासनाने नव्याने झोनची रचना जारी केल्यानंतर शुक्रवार (ता.22) पासून अंमलबजावणीला सुरवात झाली. याअंतर्गत नॉन-रेड झोनमध्ये बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिलेला होता. रेड झोन वगळता उर्वरित क्षेत्रात महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. त्यामूळे मार्च अखेरपासून आगारात उभी लालपरी रस्त्यावर बघायला मिळू लागली आहे.

सात बसगाड्या रस्त्यावर

राज्य शासनाच्या दिशानिर्देशांनुसार व परीवहन मंत्री अनिल परब यांच्या सूचनांनुसार नॉन-रेड झोनमध्ये बससेवा सुरू करण्यासंदर्भात एसटी महामंडळ प्रशासनाने बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक जिल्ह्यात पहिल्या दिवशी 135 प्रवाश्‍यांनी एसटी बसने प्रवास केला. दिवसभरात सात बसगाड्या रस्त्यावर धावल्या. या बसगाड्यांतून 24 फेऱ्यांच्या माध्यमातून 135 प्रवाश्‍यांनी प्रवास केला.

या मार्गावर सर्वाधिक प्रवासी

पेठ ते हरसूल या मार्गावर सर्वाधित 64 प्रवाश्‍यांनी एसटी बसने प्रवास केला. त्यापाठोपाठ सिन्नर ते ठाणगाव मार्गावर 38 प्रवाश्‍यांनी प्रवास केला. या मार्गावर दिवसभरात आठ फेऱ्या झाल्या. तर सिन्नर-लासलगाव मार्गावर केवळ एकट्या प्रवाश्‍यासाठी एसटी धावली. इगतपुरी-आंबेवाडी मार्गावर तीन प्रवासी, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मार्गावर नऊ, कळवण-देवळा मार्गावर दान प्रवाश्‍यांनी प्रवास केला. पेठ-जाहुले मार्गावर दहा प्रवासी, पेठ घुबडसाका मार्गावर आठ प्रवाश्‍यांसाठी एसटी बस धावली.

हेही वाचा > चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता

आवश्‍यक खबरदारीचे पालन

एसटी बसगाड्यांतून प्रवासी वाहतूकी केली जाणार असल्याने बसगाड्यांचे सॅनिटायझेशन करण्यात आले होते. तसेच प्रवाश्‍यांकडे मास्क, सॅनिटायझर असल्याबाबत खात्री केली जाते आहे. याशिवाय बसगाडीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी एका सीटवर एकच प्रवासी बसविला जातो आहे.

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After relaxing the lockdown,135 passengers traveled by bus nashik marathi news