चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता

pimpalgaon road.jpg
pimpalgaon road.jpg

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) चार वर्षांपासून खड्ड्यात गेलेल्या निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्याचे अखेर रूपडे पालटले असून, दर्जेदार कामामुळे हा मार्ग अक्षरशः चकचक करत आहे. रस्त्यालगतच्या 25 गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने नागरिकांमध्ये फीलगुडचे वातावरण आहे. मात्र ररस्त्याचे काम पूर्ण होत असताना त्याच्या श्रेयावरून मात्र निफाड तालुक्‍यातील आजी-माजी आमदारांमध्ये राजकारण तापण्याची चिन्हेदेखील दिसत आहेत.

ॲन्युटी प्रकल्पातंर्गत साकारला दर्जेदार रस्ता 

चार वर्षांपासून निफाड-पिंपळगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. ररस्त्याच्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहन दोघेही खिळखिळे व्हायचे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत "सकाळ'ने वाचा फोडली. सोशल मीडियासह नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागल्याने माजी आमदार अनिल कदम यांच्या पाठपुराव्यानंतर ऍन्युटी प्रकल्पांतर्गत पिंपळगाव बसवंत-निफाड-शिवरे-म्हाळसाकोरे रस्त्याला 151 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नोव्हेंबर 2018 मध्ये रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनानंतर वर्ष उलटले तरी कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला नाही. ठेकेदारांचे बॅंकेकडून अर्थसहाय्य होत नसल्याचे कारण पुढे आले. यावरून पुन्हा एकदा अनिल कदम यांच्यावर टीकेचे बाण सुटले. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर कामाला गती आली. मात्र तोपर्यंत नागरिकांच्या नाराजीने मतदानाच्या दिवशी निकाल बनकरांच्या पारड्यात पडला. 

दीर्घकाळ राहणारा खड्डेमुक्त 

खड्डड्यांनी चाळण व धुळीचे साम्राज्य अशी दुर्दशा झालेला पिंपळगाव-निफाड रस्ता सध्या चकाकतो आहे. 19 किलोमीटर अंतराचा या रस्त्याला आवश्‍यक त्या ठिकाणी उंची, पूल, गावाच्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण, 10 मीटर रुंदीचा रस्ता अशी या रस्त्याची वैशिष्ट्ये आहेत. दहा वर्षे ठेकेदाराने देखभाल व दुरुस्ती करणे बंधनकारक असल्याने हा मार्ग दीर्घकाळ खड्डेमुक्त असणार आहे. दिलीप बनकर यांनी आमदारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आवश्‍यक ते बदल या रस्त्याच्या कामात करत पिंपळगावच्या पाराशरी नदीवर पूल मंजूर करून घेतला आहे. निफाड तालुक्‍याच्या ठिकाणी, तर पिंपळगावला शेतमालाच्या बाजारपेठेमुळे ये-जा करावी लागणाऱ्या पालखेड, कारसूळ, लोणवाडी, दावचवाडी, रौळस आदी 25 गावांचा दळणवळणाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. अवघ्या दोन किलोमीटर अंतराचे काम शिल्लक असून, येत्या दहा दिवसांत ते पूर्णत्वास जाईल. 

श्रेयावरून तापणार तालुक्‍याचे राजकारण 

पिंपळगाव-निफाड रस्त्याचे काम पूर्णत्वास जात असताना त्याच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये राजकारण रंगण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. माजी आमदार कदम समर्थकांनी हे काम अण्णांमुळेच झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

आमदार झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग दिला. पूर्वी मंजूर असलेल्या रस्त्यात अनेक त्रुटी होत्या. पुलाची रुंदी वाढविणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या रचनेत बदल केला. पंधरा दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होईल. - दिलीप बनकर, आमदार 

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याला निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन केले. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने निफाड तालुक्‍यात मी पाहिलेली दळणवळणाची स्वप्ने सत्यात उतरत आहेत. काहींकडून रस्त्यावरून मला घेरण्याचा प्रयत्न झाला. पण कामातून मी उत्तर दिले आहे. या रस्त्याचे कुणीही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. निवडणुकीचा कौल मी स्वीकारला असून, माझे राजकारण संपले, असे वाटणाऱ्यांनी हवेत राहावे. - अनिल कदम, माजी आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com