दिलासादायक! जिल्ह्यात दोन दिवसांनंतर बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक; वाचा सविस्तर

अरुण मलाणी
Sunday, 6 September 2020

दोन दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या शनिवारी (ता. ५) अधिक राहिली. नव्‍याने ९५१ बाधित आढळून आले असून, ९७३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या ३२ ने घटली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक आढळल्‍याने ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या घटली आहे. ऐरवी बाधितांचा आकडा बरे झालेल्‍या रुग्‍णांपेक्षा मोठा असताना, दोन दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या शनिवारी (ता. ५) अधिक राहिली. नव्‍याने ९५१ बाधित आढळून आले असून, ९७३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या ३२ ने घटली आहे. 

शनिवारी आढळले ९५१ बाधित

शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७२४, नाशिक ग्रामीणचे १३७, मालेगावचे ९० रुग्‍णांचा समावेश असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२ हजार ५१६ झाला आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८४२, नाशिक ग्रामीणचे १०७, मालेगावचे २०, तर जिल्‍हाबाह्य चार रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून बरे झालेल्‍या रुग्‍णांचा आकडा ३४ हजार १३५ झाला आहे. दहा मृतांमध्ये नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणचे पाच, तर मालेगाव महापालिका हद्दीतील एका रुग्‍णाचा समावेश आहे.

९७३ रुग्ण कोरोनामुक्त

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार १३५, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात २९६, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २१, जिल्‍हा रुग्‍णालयात तेरा संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ३७८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यातील सर्वाधिक एक हजार ५४९ नाशिक ग्रामीण भागातील आहेत. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

मालेगावात बाधिताचा मृत्यू 

मालेगाव : शहर व परिसरात शुक्रवारी अवघे तीन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मिळालेला दिलासा शनिवारी निरर्थक ठरला. आज नव्याने ९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. शहरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील कोरोनाबळींची संख्या ११४ झाली आहे. नव्याने आलेल्या ९० रुग्णांमध्ये शहर, ग्रामीण व परिसरातील रुग्ण आहेत. येथील रुग्णसंख्येने पुन्हा साडेसहाशेचा टप्पा ओलांडला आहे. आज दिवसभरात नव्याने २५ रुग्ण दाखल झाले. ३७७ अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After two days in the district, the number of corona free is more than the number of victims nashik marathi news