लग्न ठरवतानाच "सावधान" म्हणायची वेळ?

सकाळ वृतसेवा 
Thursday, 16 January 2020

सध्या सर्वच समाजातील विशेषतः मुलांचे लग्न ठरवता ठरवता घायकुतीला आलेले पालक अशा धंदेवाईक वधू-वर सूचक मंडळींचे लक्ष्य ठरत आहेत. "गरजवंताला अक्कल नसते', या म्हणीची प्रचीती काही धंदेवाईक वधू-वर सूचक एजंटकडून फसवल्या गेलेल्या विवाहेच्छुंच्या पित्यांशी चर्चा केल्यावर लक्षात येते.

नाशिक  : लग्न ठरवण्याच्या वाटाघाटींना काही लग्न जमावणाऱ्या एजंटांनी धंद्याचे स्वरूप आणल्याने "शुभमंगल सावधान' म्हणण्यापूर्वी आता "लग्न ठरवतानाच सावधान' म्हणायची वेळ वधू-वर पालकांवर आली आहे. लग्न ठरवणे, इच्छुक वधू-वरांची ओळख करून देणे, एक नवा संसार सुरू करण्यासाठी आपल्या ओळखीच्या शब्दांचा आधार मिळवून देणे हे तसे खूप चांगले काम; पण काळाच्या बदलत्या प्रवाहात या कामाचा काहींनी "धंदा' सुरू केल्याने विवाहेच्छुंचे शोषण होऊ लागले आहे. 

एजंटांनी धंद्याचे स्वरूप आणल्याने विवाहेच्छुंचे शोषण 

सध्या सर्वच समाजातील विशेषतः मुलांचे लग्न ठरवता ठरवता घायकुतीला आलेले पालक अशा धंदेवाईक वधू-वर सूचक मंडळींचे लक्ष्य ठरत आहेत. "गरजवंताला अक्कल नसते', या म्हणीची प्रचीती काही धंदेवाईक वधू-वर सूचक एजंटकडून फसवल्या गेलेल्या विवाहेच्छुंच्या पित्यांशी चर्चा केल्यावर लक्षात येते. या एजंटांकडून सुरवातीला नावनोंदणी करतानाच बिनपावतीचे दोन ते पाच हजार रुपये, चौकशीसाठी केलेल्या फोनचा वेगळा खर्च, येण्या-जाण्यासाठी दिलेल्या वेळेचा मोबदला, चांगल्यात चांगले स्थळ दाखवण्यासाठी वेगळे शुल्क व लग्न ठरल्यावर खुशीच्या नावाखाली सक्तीने घेतला जाणारा "आहेर' असे काही चित्र ग्रामीण व शहरी भागात पाहावयास मिळत आहे. 
समाजातील काही संस्था खरोखरच हे काम वेगळ्या जाणिवेने करत आहेत. मात्र ज्याला काम नाही, अशा काहींनी बिनभांडवली कमाईचे साधन म्हणून हे काम निवडल्याने वधू-वर सूचक मंडळांकडे लोक संशयाने पाहू लागले आहेत. कसमादे परिसरात काही उदाहरणे पाहिली तर वधू-वर सूचकाचे काम करणारे काही जण नोंदणीसाठीच दोन ते पाच हजार रुपये घेतात. पुढची चर्चा करायची असेल, तर त्याचे वेगळे शुल्क आकारतात. एका पालकाने नाव न छापण्याच्या बोलीवर सध्या समाजातील विवाह जोडणाऱ्या सूचकांसंबंधी विविध अनुभव व कशाप्रकारे विवाहेच्छुंची घालमेल होत आहे, हे सांगितले. म्हणूनच शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वी "लग्न ठरवतानाच सावधान' म्हणायची वेळ वधू-वर पालकांवर आली आहे. 

ह्रदयद्रावक -  VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

ठराविकच स्थळ सर्वांना दाखव 
स्थळ दाखवण्याची जबाबदारी पूर्ण केली, असे दर्शविण्यासाठी एकच ठराविक "स्थळ' सर्वांना दाखवतात. त्या स्थळाने तुम्हाला नापसंत केल्याचे सांगतात. विशेषत: व्यंग असलेल्या, वय उलटून गेलेल्या किंवा घटस्फोटितांचे विवाह ठरवताना जेवढे उकळता येईल, तेवढे उकळण्याचा या लोकांचा प्रयत्न असतो. पालकांच्या हतबलतेचा जेवढा फायदा घेता येईल, तेवढा या निमित्ताने घेतात. विवाहेच्छु पित्यांना हतबल होत सारे निमूटपणे सहन करावे लागत आहे, अशी परिस्थिती आहे. 

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agents makes business of marriages trouble parents Nashik Marathi News