"...अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडू" शेतीप्रश्‍नांसाठी 'त्यांचा' तीन तास ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे तीन महिन्यांत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही शासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. ​

नाशिक/ सटाणा : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे तीन महिन्यांत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही शासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.29) बागलाणच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन छेडले.

कांदा निर्यातीस प्रोत्साहन द्यावे 
शासनाने ज्या शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रासाठी पिकाची ऑनलाइन नोंद केली आहे, अशा शेतकऱ्यांचा सर्वच मका व कापूस खरेदी करावा तसेच शासनातर्फे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा मका व कापूस खरेदी होत नसेल तर त्या शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावानुसार मोबदला बॅंक खात्यात द्यावा. जिल्ह्यात व महाराष्ट्रात कांद्याचे दर खूप कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्वरित अनुदान व निर्यातीस प्रोत्साहन द्यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा

सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पोचवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रयत क्रांती संघटनेने आंदोलन मागे घेतले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पगार यांनी दिला. या आंदोलनात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार, राज्य सरचिटणीस डोंगर पगार, भिका धोंडगे, रमेश अहिरे, मधुकर पगार, शरद पगार, नरेंद्र पगार, विशाल धोंडगे, चिंतामण शिरोळे, ज्ञानेश्‍वर पगार, वीरेंद्र पगार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for three hours for agricultural questions nashik marathi news