कृषिमंत्री म्हणतात..."नाशिकमध्येही मालेगाव पॅटर्न अमलात आणावा"

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

लॉकडाउनचा बाऊ न करता दुकाने उघडी करण्यास परवानगी देण्यात आली. त्यातही संयम बाळगण्यात आला. रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन वैद्यकीय, आरोग्य यंत्रणेने 24 तास काम केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. 

नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. परंतु शहरातील ऍलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक अशा सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना कार्यरत करून त्यांच्यामार्फत चाचण्या घेतल्या. नागरिकांनीही फॅमिली डॉक्‍टर म्हणून त्यांच्याकडून तपासण्या केल्याने कोरोनाचे वास्तव स्वरूप समोर येऊन त्यानुसार उपचार पद्धती अवलंबली. परिणामी, मालेगावमधील कोरोना नियंत्रणात आल्याने नाशिकमध्येही हाच मालेगाव पॅटर्न अमलात आणावा, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना केल्या. 

कोविड आढावा बैठकीत दादा भुसे यांच्या सूचना 
मेअखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर दादा भुसे यांनी बुधवारी (ता. 17) महापालिकेला भेट देत कोविड-19 चा आढावा घेतला. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड व अधिकारी आदी उपस्थित होते. शहरात सद्यःस्थितीत 808 इतके रुग्ण असून, त्यातील 287 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 481 इतके रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 40 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातही पूर्वीच्या आजारांचा संदर्भ असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली. 

मालेगाव पॅटर्न यशस्वी 
एप्रिलमध्ये मालेगावमधील कोरोना परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली. रुग्ण तपासणीसाठी बाहेर पडत नसल्याने सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना कार्यरत करण्यात आले. स्थानिक डॉक्‍टरांवर नागरिकांचा विश्‍वास असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. सर्दी, खोकल्याचे रुग्ण गोळ्या, औषधे देऊन बरे करण्यात आले. तपासण्या वाढविल्याने मृत्युदर कमी करण्यात यश आले. लॉकडाउनचा बाऊ न करता दुकाने उघडी करण्यास परवानगी देण्यात आली. त्यातही संयम बाळगण्यात आला. रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन वैद्यकीय, आरोग्य यंत्रणेने 24 तास काम केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

भुसे यांच्या सूचना 
- महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवा 
- खासगी रुग्णालयांमध्ये आवश्‍यक सुविधा उपलब्ध करा 
- कोरोना संशयितांच्या चाचण्यांची संख्या वाढवा 
- महापालिका व शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा 
- वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णांचे मनोधैर्य वाढवा 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

तरी घाबरून जाऊ नये
मालेगावच्या धर्तीवर नाशिकमध्येही परिस्थिती नियंत्रणात येईल. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. कोरोना प्रादुर्भाव वाढत असला तरी घाबरून जाऊ नये. -दादा भुसे, कृषिमंत्री  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister said "Malegaon pattern should be implemented in Nashik too marathi news