नियम धाब्यावर...जिथं पुढाऱ्यांनाच पडतो 'फिजिकल डिस्टन्स'चा विसर...तिथं सर्वसामान्यांचं काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोना संकटाचा चांदवडच्या सर्वपक्षीयांना विसर पडल्याचे दिसून आले. निमित्त होते बागलाण (सटाणा) येथील कोविड सेंटर चांदवडला हलविण्याबाबत विरोध करतांना सादर केलेल्या निवेदनाचे आणि यावेळी डावलण्यात आलेल्या नियमांचे... 

नाशिक : कोविड १९ हा आजार आला आणि देशाला नव्हे तर जगाला स्तब्ध करून गेला. गेला कसला त्याचे मानवी जीवावर व जीवनावर आक्रमण सुरूच आहे, पण या संकटाचा चांदवडच्या सर्वपक्षीयांना विसर पडल्याचे दिसून आले. निमित्त होते बागलाण (सटाणा) येथील कोविड सेंटर चांदवडला हलविण्याबाबत विरोध करतांना सादर केलेल्या निवेदनाचे आणि यावेळी डावलण्यात आलेल्या नियमांचे... 

स्वतःच्या वर्तणूकीबाबत मात्र खबरदारीचा विसर 

बागलाण (सटाणा) तालुक्यातील कोविड सेंटर नुकतेच चांदवड येथे हलविण्यात आले. याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व रोष वाढत असल्याचे बघून चांदवडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांना या सेंटरला विरोध करत असल्याबाबतचे निवेदन सादर केले. हे निवेदन सादर करताना सर्व पक्षीय नेत्यांनी फिजिकल डिस्टन्सचा मात्र पुरता फज्जा उडवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे तहसीलदारांच्या खुर्चीभोवती दिलेल्या गराड्यात १६ पुढाऱ्यांसह चिमुकल्या लेकराचा देखील समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चिमुकल्या लेकराला कडेवर घेऊन निवेदन

कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांसह वृद्ध नागरिकांना असताना चिमुकल्या लेकराला कडेवर घेऊन निवेदन देण्यात पालकांनी धन्यता मानली. तालुक्याच्या अतिमहत्वाच्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या दालनात सर्वपक्षीय नेते आपल्या भावना घेऊन गर्दी करतात. ह्या भावना कितीही काळजीच्या, खबरदारीच्या असल्या तरी स्वतःच्या वर्तणूकीबाबत मात्र ह्या खबरदारीचा त्यांना विसर पडला. 

नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का?

एकमेकांना अगदी चिपकुन या पुढाऱ्यांनी निवेदन सादर केलेच पण फोटोत चेहरा व्यवस्थित दिसावा म्हणून की काय नाकावरील मास्क खाली ओढण्यास देखील काही पुढारी कचरले नाहीत. त्यामुळे 'फिजिकल डिस्टन्स' पाळले नाही म्हणून पोलिसांच्या लाठीचा प्रसाद सहन करणार्यांना, ते बघणाऱ्या नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा प्रश्न पडतोय. निवेदन सादर करतांना चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अशोक व्यवहारे, जगन राऊत , प्रकाश शेळके, संजय जाधव, सुनिल कबाडे, रिझवान घासी, मनोज शिंदे, नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, नाना विसपुते, समाधान जामदार, नितीन थोरे, सागर बर्वे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

सर्वसामान्यांना दंड पुढाऱ्यांचे काय? 

दरम्यान लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर आजपर्यंत चांदवड नगरपरिषदेने चार हजार रुपयांचा दंड आकारला आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे, मग आता चांदवडच्या सर्वपक्षीय नेत्यांनीच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याचे समोर आल्याने त्यांना दंड आकारला जाईल की विशेष सवलत देण्यात येईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All party leaders in Chandwad violated the 'physical distance' rule nashik marathi news