esakal | प्रभाग बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती; ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

nagarsevak.jpg

सार्वजनिक शौचालय ठेकेदाराला मनपा फुकट पोसत असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. प्रभाग ४ मधील मनपा शाळेच्या स्वच्छतागृहांची अस्वच्छता, तारवालानगर परिसरातील बंद पथदीप याविषयी नगरसेविका सरिता सोनवणे यांनी तक्रारी मांडल्या.

प्रभाग बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती; ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी विभागात अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत केला.

अधिकाऱ्यांना धारेवर धरले

पंचवटी प्रभाग सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, विभागीय अधिकारी विवेक धांडे, नगरसेवक जगदीश पाटील, मच्छिंद्र सानप, हेमंत शेट्टी, सुरेश खेताडे, कमलेश बोडके, पूनम मोगरे, प्रियंका माने, सरिता सोनवणे उपस्थित होते. बैठकीत नगरसेवकांनी एलईडी लाइट कामात ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिका सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमा नसल्याचा निषेध करीत नगरसेविका पूनम मोगरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा भेट देत ‘गांधीगिरी’ केली.

तीन हजार पथदीप पोल गायब?

गटनेते जगदीश पाटील यांनी, पंचवटी विभागात २० ते २१ हजार पथदीप पोल असून, अधिकारी केवळ १७ हजार पोल असल्याची माहिती देत असून, तीन हजार पथदीप पोल कमी दाखविण्यात कुणाला पाठीशी घातले जाते आहे. सार्वजनिक शौचालय ठेकेदाराला मनपा फुकट पोसत असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. प्रभाग ४ मधील मनपा शाळेच्या स्वच्छतागृहांची अस्वच्छता, तारवालानगर परिसरातील बंद पथदीप याविषयी नगरसेविका सरिता सोनवणे यांनी तक्रारी मांडल्या.

प्रभाग दोनमध्ये स्वच्छता कर्मचारीसंख्या कमी असून, ही संख्या वाढवावी. एलईडी लाइट कमी वॅटचे बसविले असल्याचे सुरेश खेताडे यांनी सांगितले. प्रभाग तीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे पूनम मोगरे यांनी सांगितले. तर ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात तत्परतेने कामे होतात, असा आरोप नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी केला.