'ऑक्सिजन वाहतूक वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा' - जिल्हाधिकारी सूरज मांढरे

विनोद बेदरकर
Monday, 14 September 2020

जिल्ह्यातील वैद्यकिय क्षेत्राची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर निश्‍चित करीत, ऑक्सिजन उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करावेत. बंदी घातलेल्या उद्योगांकडे परस्पर ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

नाशिक : कोरोना रूग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला जाणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाहनांना रुग्णवाहिकेचे नियम लागू राहणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज या सूचना दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश भामरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते. 

ऑक्सिजनचा पुरवठा होणार सुरळीत होणार

जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागातील लहान-मोठ्या रुग्णालयात प्रतिदिवस सरासरी किती ऑक्सिजन लागतो. याविषयी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांनी प्रत्यक्ष वापराची माहिती घेऊन तांत्रिक माहिती बिनचूक रित्या संकलित करावी. रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतांना, हयगय होणार नाही याची रोज खात्री करुन आपत्कालीन केंद्राला दैनंदिन अहवाल पाठवावा असेही निर्देश मांडरे यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील वैद्यकिय क्षेत्राची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर निश्‍चित करीत, ऑक्सिजन उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करावेत. बंदी घातलेल्या उद्योगांकडे परस्पर ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. 

माधुरी पवार यांना जबाबदारी 

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजनसाठा, ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न सुरु आहे. याविषयी अन्न व औषध विभागाला नियंत्रणचे स्पष्ट निर्देश दिले. जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून त्याचा पुरवठा सर्व रुग्णालयांना योग्य प्रकारे होतो का याची शहानिशा अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी करावी व तसा दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राकडे देण्याची जबाबदारी निश्‍चिती केली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

ऑक्सिजनचा पुरवठ्याच्या जबाबदारी निश्‍चीत

जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय औद्योगिक वापरात समन्वय तसेच टँकर अथवा ऑक्सीजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनांची सुलभ वाहतुक या सर्व बाबींचे संनियंत्रण निवासी उपजिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त , जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती ऑक्सिजनचा पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवेल. अशा स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी ऑक्सिजनचा पुरवठ्याच्या जबाबदारी निश्‍चीती केली. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance status for oxygen transport vehicles nashik marathi news