पाणीपट्टीत साडेदहा कोटींची घट; तरी सक्तीची वसुली नको, आयुक्तांच्या सूचना 

विक्रांत मते
Thursday, 8 October 2020

शहरात एक लाख ९८ हजार ३०९ नळजोडणी आहे. सिडको विभागात ५४ हजार ६९६, पंचवटी विभागात ४१ हजार ५२७, नाशिक रोड विभागात ३२ हजार ६२२, सातपूर विभागात २९ हजार ४३०, पूर्वमध्ये २९ हजार ४०३ तर, पश्चिम विभागात १० हजार ६३१ याप्रमाणे नळजोडण्या आहेत.

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होत असून, पाणीपट्टीत सहा महिन्यात साडेदहा कोटींची घट झाली आहे. महसूल मिळत नसला तरी महापालिकेकडून थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली न करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. 

शहरात एक लाख ९८ हजार ३०९ नळजोडणी आहे. सिडको विभागात ५४ हजार ६९६, पंचवटी विभागात ४१ हजार ५२७, नाशिक रोड विभागात ३२ हजार ६२२, सातपूर विभागात २९ हजार ४३०, पूर्वमध्ये २९ हजार ४०३ तर, पश्चिम विभागात १० हजार ६३१ याप्रमाणे नळजोडण्या आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १०५ कोटी ८६ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. यात थकबाकीच्या ८०.१२ कोटींचा समावेश आहे. या वर्षासाठी २५.७३ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. मार्चमध्ये स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर महासभेत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. एप्रिलपासून पाणीपुरवठा विभागाकडून वसुली होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. महापालिकेत फक्त तीस टक्के कर्मचारी हजेरी बंधनकारक करण्यात आल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला. ऑनलाइन करभरणा सुरू असला तरी नागरिकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. सहा महिन्यात १३.९२ कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २४.४० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यावर्षी १०.४८ कोटींची महसुलात घट झाल्याने महापालिकेवरचे आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

विभागनिहाय पाणीपट्टी वसुली (रुपयात) 
विभाग पाणीपट्टी वसुली 

सातपूर ९९, ३९, ६४० 
पंचवटी १, ८२, ६५, ६३७ 
सिडको १, ७५, १२, २११ 
नाशिक रोड ३, २७, ७३, २५८ 
पश्चिम २, ९६, ७०, ६८८ 
पूर्व ३, ११, ३४, ७७५ 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrears of water tax bills are 10.5 crores in nashik marathi news