अट्टल गुन्हेगार 'जिमी' अखेर पोलीसांच्या ताब्यात! अनेक गुन्ह्यांचा उलगडा शक्य ​

रोशन खैरनार
Wednesday, 11 November 2020

धुळे कारागृहातून जिमीला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या संशयिताच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलघडा होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक  गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. 

सटाणा (जि.नाशिक) : शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या आणि तीन राज्यांत विविध गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांना मोठे यश आले आहे. जिमी बिपीन शर्मा (वय २७, रा. गुरुकुलनगर, नंदुरबार) असे या आरोपीचे नाव असून, धुळे कारागृहातून त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या संशयिताच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलघडा होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक  गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. 

सटाणा पोलिसांना मोठे यश; अनेक गुन्ह्यांचा उलगडा शक्य 
याबाबत सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबरला शहरातील नामपूर रोडलगत पाठक मैदान परिसरात विजय माणिक आहेर हे दुपारी कुटुंबीयांसोबत घराला कुलूप लावून शेतामध्ये गेल्यानंतर घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी झाली होती. भरदिवसा झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगात फिरवल्याने अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल होऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात मोठे यश मिळविले. 

सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने लागला शोध

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरी करणारा व्यक्ती हा धुळे येथे असल्याचे समजले. याबाबत धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधला असता, फुटेजमधे दिसणारा जिमी बिपीन शर्मा हा युवक राजस्थान, हरियाना व गुजरात राज्यात अनेक गुन्हातील सराईत गुन्हेगार असून, तो नंदुरबार येथील रहिवासी आहे. सध्या एका अन्य गुन्ह्यात धुळे येथील कारागृहात तो शिक्षा भोगत असल्याचे त्यांनी सटाणा पोलिसांना सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, प्रकाश शिंदे, जितेंद्र पवार, योगेश गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिमीला धुळे कारागृहातून ताब्यात घेतले. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

सणासुदीच्या काळात नागरिकांनी सावधान राहावे

संशयिताची चौकशी सुरू असून, चोरी केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांनी चोरट्यांपासून सावधान राहावे. कुणी अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. -नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for burglary from satana police nashik marathi news