नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात हिवाळी ‘पाहुण्यां’चे आगमन; ऑक्टोबरमध्ये अभयारण्य खुले होण्याचे संकेत 

winter birds.jpg
winter birds.jpg

नाशिक : गोदावरी-कडवा नदीच्या संगमावरील धरणाच्या विशाल जलाशयात अर्थात नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात हिवाळी ‘पाहुण्यां’चे आगमन सुरू झालेय. खाटीक, वेडा राघू, मुनिया, वारकरी, जाकाना, ग्रे हेरॉन, कापशी घार, मार्श हेरिअर, पेंटेड स्टोर्क, गडवाल, हळदी-कुंकू, थापट्या, धनेश, किंगफिशर आदी पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. 

पक्षांचा किलबिलाट वाढला
नांदूरमध्यमेश्‍वर बंधारा १९०७-१९१३ मध्ये बांधला गेला होता. गाळ साचून आणि वनस्पतींची वाढ होऊन इथे पक्ष्यांसाठी उत्कृष्ट असा अधिवास निर्माण झाला. अर्थात, अशी पाणथळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षित करते. अभयारण्यात २६५ पक्षी प्रजातींची नोंद केली गेली आहे. कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. पुढील महिन्यात पर्यटकांसाठी राज्यातील अनेक अभयारण्य खुली केली जाण्याचे संकेत मिळत असून, त्यात नांदूरमध्यमेश्‍वरचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इथे हिवाळ्यात पक्षी स्थलांतर करून मुक्कामी येतात. त्यांना पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात.

पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंगचा प्रस्ताव

आताच्या कोरोना महामारीमुळे अभयारण्यामध्ये पर्यटन कसे सुरू करता येईल याचा विचार केला जात असून, राज्यातील अभयारण्यातील पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंगचा प्रस्ताव पुढे आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 
नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य, कळसूबाई शिखर, हरिश्‍चंद्र गड, दुगारवाडी धबधबा अशी अनेक पर्यटनस्थळे असून, या सर्व ठिकाणी ऑनलाइन बुकिंग करून पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. अभयारण्य बंद असल्याने गाइड, वनमजूर आदींच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ग्राम परिस्थितीकीय समितीच्या खात्यात पैसे नसल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यावर उपाय म्हणून अभयारण्य सुरू करण्यासाठी विचार केला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हिवाळ्यामध्ये दर वर्षी वन विभागातर्फे दर महिन्याला पक्षीगणना केली जाते. यंदा पहिली पक्षीगणना पुढील आठवड्यात केली जाणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून वन कर्मचारी, गाइड आणि काही पक्षी अभ्यासक त्यामध्ये सहभागी होणार आहेत. 

लॉकडाउनमध्ये आणि नंतर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. हिवाळी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे. पुढील आठवड्यात वरिष्ठांच्या परवानगीने पहिली पक्षीगणना केली जाणार आहे. निवडक पक्षी अभ्यासकांनाही पक्षीगणनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. -अशोक काळे, प्रभारी, वनपरिक्षेत्र अधिकारी  

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com