कोरोनापेक्षा त्यांच्या "त्या' नजरांचीच अधिक भीती...आशा कर्मचारी सांगताएत 'आपबिती'...थरारक अनुभव

aasha karyakrtya.jpg
aasha karyakrtya.jpg

नाशिक : कोरोनाच्या महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना वेळीच सावध करण्यासारखे विधायक कार्य करूनही पदरी काय पडतेय, तर शिवीगाळ, शेरोशायरी, ठार करण्याच्या धमक्‍या...एखाद्या गल्ली-मोहल्ल्यात गेल्यावर तेथील खिळून राहणाऱ्या त्या नजरा कधी कधी कोरोनापेक्षाही भयंकर वाटतात...हे अनुभव आहेत, तब्बल तीन महिन्यांपासून स्वत:च्या व कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता घरोघरी फिरून कोरोनाग्रस्त शोधण्याचे काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचे...

"तूच सोबत कोरोना घेऊन आली' 

आपले अनुभव कथन करताना गायत्री खत्री म्हणाल्या, की मी फुलेनगर भागात तपासणी करते. हा भाग हॉटस्पॉट बनला आहे. अगदी बुधवारचीच गोष्ट. मी नेहमीच्या तपासणीसाठी राजदूतनगर (फुलेनगरचा एक भाग) येथे गेली होती. तेथील एकाने मला गल्लीत न येण्याचे सांगितले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. "तू गल्लीत आलीस, तर तुझे बारीक बारीक तुकडे करील आणि तुझ्या घरच्यांना दाखविणारसुद्धा नाही' अशी धमकी दिली. मी पोलिसांना तक्रार करण्याचे बोलले, तर त्याने उलट प्रतिउत्तर करत म्हटले, "मी पोलिस खिशात घेऊन फिरतो.' "सरकारकडून आलेय', हे सांगूनही मान्य करत नाही. ज्यांच्यासाठी जीव धोक्‍यात घालून काम करते. तेच मला, "तूच सोबत कोरोना घेऊन आली' असे बोलतात. दारू पिऊन छेड काढल्याच्या घटना तर रोजच्याच आहेत. अनेकदा काम सोडण्याचे विचार मनात येतात. कोणत्याही प्रकारचे साधन नसताना सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत पायी फिरते. गटप्रर्वतकांना जोपर्यंत माहिती देत नाही, तोपर्यंत सुटी मिळत नाही. भराडवाडीसारख्या भागात रोज फिरताना घरात माझे साडेतीन वर्षांचे लहान मूल असल्याने माझ्यामुळे त्याचाही जीव धोक्‍यात आहे. 

"अंदर आजा मुझे पिला दे'
 
अंबड भागातील कांचन पवार म्हणाल्या, की अंबड भागात नवीन असल्याने सुरवातीला नागरिकांचा अतिशय त्रास झाला. लॉकडाउनमध्ये पोलिओचे लसीकरण घरोघरी जाऊन केले. या वेळी एकाने "अंदर आजा मुझे पिला दे' या अतिशय अश्‍लील शब्दात आमची छेड काढली. यामुळे मानसिक खच्चीकरण होते. अनेक भागात नागरिक दारू पिऊन शिव्या देतात. केवळ पुरुषच नव्हे, तर बायकादेखील वाईट शब्दांत बोलतात. दारात गेल्यावर हकलवून लावतात. 

बाहेरूनच हकलून दिले 

सातपूर भागातील विद्या आंदूकर म्हणाल्या, की कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर अनेक कुटुंबांनी घरात न घेता बाहेरूनच हकलून दिले. तू बाहेरून कितीतरी लोकांना भेटून आली आणि नंतर आम्हाला तपासणार? आम्हाला फक्त तुझ्यामुळे कोरोना होईल. अनेक जण कोणताही त्रास असल्यास तो लपवतात. मनात अतिशय भीती असतानाही काम सोडता येत नाही. दारू पिऊन शिवीगाळ करणे आणि रस्त्यात अडवणूक करणे ही तर नित्याची बाब झाली आहे. 

कोयता घेऊन मागे लागला 

दिंडोरी नाका ते मेरी कॉलनीदरम्यान सर्वेक्षण करणाऱ्या प्रमिला पाटील म्हणाल्या, की माझ्या ठरवून दिलेल्या विभागात सर्वेक्षणासाठी गेले असता, एक जण दारू पिऊन कोयता घेऊन मागे लागला. त्या वेळी मनात एका क्षणासाठी आयुष्य संपल्याचीही भावना मनात डोकावून गेली. या भागात पुन्हा आलीस तर हातपाय तोडून टाकण्याची त्याने मला धमकी दिली. परंतु काम असल्याने मला तिथे जाणे भाग आहे. तपासणी करण्यासाठी गेली तर मला हकलवून दिले जाते. मला सांगितले जाते, की आम्हाला काही त्रास झाला तर आम्हाला डॉक्‍टर आणि दवाखाने माहीत आहे. त्यासाठी तू येण्याची गरज नाही. 

हजारासाठी लाख मोलाचा जीव पणाला 

आशा कर्मचारी तीन महिन्यांपासून काम करत आहोत. यामध्ये आमच्या स्वतःच्या जिवाला धोका, तर आहेच; पण आमच्या कुटुंबीयांच्याही जिवाला धोका आहे. मात्र आम्ही करत असलेल्या कामाचे मोल सरकारने केवळ एक हजार रुपयांत केले आहे. हजार रुपयांसाठी आम्ही दारोदारी फिरत आहोत. सरकारने कोरोना विषाणूच्या या काळात तरी आम्हाला पगार वाढवून देणे आवश्‍यक होते, ही खंतदेखील आशा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com