कौतुकास्पद! अश्विनी जाधव ठरली बागलाणची पहिली महिला सैनिक; पंचक्रोशीत आनंद

ashwini jadhav.jpg
ashwini jadhav.jpg

नाशिक : (अजमीर सौंदाणे) खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. अजमीर सौंदाणे (ता.बागलाण) येथील भूमीकन्या अश्विनी जाधव हिने भारतीय सैन्यदलात रायफलमेन पदावर रुजू होत सैन्य दलातील बागलाण तालुक्याची पहिली कन्या ठरली आहे. 

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी...

प्रकाश लोटन जाधव व सरला जाधव या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याची अश्विनी ही लेक. तीन मुली व एक मुलगा असलेल्या भावंडात अश्विनी ही सर्वात लहान. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जनता विद्यालय अजमेर सौंदाणे येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अश्विनीला बालपणापासून देशभक्तीची आवड होती. सैन्यदलाबद्दल प्रचंड आकर्षण होते. कुटुंबातील कुणीही सैन्यदलात नसल्याने मार्गदर्शनाचा अभाव. स्वतः जिद्दी असल्याने सोशल मिडीयाचा वापर केला. यू-ट्यूबच्या सहाय्याने माहिती मिळवली. सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबादच्या गरुडझेप कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. तेथील परिपूर्ण मार्गदर्शन, रोजचा नियमितपणे केलेला सरावाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. 

पंचक्रोशीतही होतंय कौतुक...

सैन्यदलाच्या २०१९ भरतीत आसाम रायफल-९ बटालियनमध्ये निवड झाली. डिमापूर (नागालँड) प्रशिक्षण केंद्रात नऊ महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर अरुणाचल प्रदेश येथे पदस्थापना दिली आहे. नोकरीतील संपूर्ण सेवा देशाच्या पूर्वेकडील नॉर्थ - ईस्ट राज्यांमध्ये करावी लागणार आहे.
 सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली अश्विनी ही आपल्या यशाचे श्रेय आई - वडील, भाऊ भूषण, बहिणी यांना देते. शेती मातीत राबणाऱ्या हातांचे संस्कार देशसेवेची प्रेरणा  व आदर्श असल्याचे अभिमानाने सांगते. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे सैन्यदलात सामील होत देशसेवेचे स्वप्न पूर्ण झाले. तिच्या धाडसाचे व आई-वडिलांच्या पाठबळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भारतासारख्या कृषिप्रधान देशातील लेकींनी सैन्यदलात बिनधास्त सामिल व्हा. देशसेवा ही काळाची गरज आहे. करियर करण्यासाठी सैन्यदलात खूप संधी आहेत. अनेक महिला सैनिकांचा आदर्श ठेवून ही भरारी घ्यावी. - अश्विनी जाधव, पहिली महिला सैनिक

सैन्यासारखे क्षेत्र अश्विनीने निवडले ही भूषणावह बाब आहे. सैन्यदलातील बागलाण तालुक्यातील पहिली कन्या ठरल्याने गावासाठी अभिमानास्पद आहे. अश्विनीचा आदर्श ठेवत अनेक मुली सैन्यदलात जाण्यास प्रेरणा घेतील. - रमेश रघुनाथ पवार, माजी सैनिक, अजमीर सौंदाणे

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com