बिहारमधील निवडणुका संपताच कामगारांची कामासाठी विचारणा; विविध उद्योगांमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता  

सतीश निकुंभ
Sunday, 15 November 2020

लॉकडाउनमुळे उत्तर भारतातील लाखो कामगार गावी परतल्याने महाराष्ट्रातील विविध उद्योगांमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. अनेक कंपन्यांचे उत्पादन कामगारांअभावी बंद होते. संबंधित कंपनी व्यवस्थापनाने अनेकवेळा या कामगारांना परत आणण्याचा प्रयत्न केला. पण, प्रामुख्याने बिहारमधील विधानसभा निवडणुकीमुळे हे कामगार त्या वेळी परत येण्यास नकार देत होते.

सातपूर (जि.नाशिक) : लॉकडाउनमुळे उत्तर भारतातील लाखो कामगार गावी परतल्याने महाराष्ट्रातील विविध उद्योगांमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. अनेक कंपन्यांचे उत्पादन कामगारांअभावी बंद होते. संबंधित कंपनी व्यवस्थापनाने अनेकवेळा या कामगारांना परत आणण्याचा प्रयत्न केला. पण, प्रामुख्याने बिहारमधील विधानसभा निवडणुकीमुळे हे कामगार त्या वेळी परत येण्यास नकार देत होते. आता मात्र निवडणूक संपताच या कामगारांनी महाराष्ट्रात कामाला येण्यासाठी ठेकेदार व उद्योगांकडे विचारणा सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

कामगारांची आजही उणीव भासतेय

लॉकडाउनच्या काळात तब्बल तीन महिन्यांनी महाराष्ट्रातील उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न झाले. त्या वेळी ठराविक कामगारांची अट घातली गेली. तरीदेखील स्टील, बांधकाम, कृषी, ट्रान्स्पोर्ट, लोडिंग अनलोडिंगगसह अन्य क्षेत्रांतील अनेक उद्योग कामगारच नसल्याने सुरू होऊ शकले नव्हते. यापैकी काही उद्योगांनी महाराष्ट्रातील तरुणांची तात्पुरती भरती करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असला, तरी स्टील, बांधकाम व हीट ट्रीटमेंट अथवा भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची आजही उणीव भासत आहे. या क्षेत्रात काम करणारे बहुतेक कामगार उत्तर भारतातील असतात. त्यामुळे या उद्योगातील व्यवस्थापनांनी अनेक वेळा ठेकेदारांमार्फत या कामगारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्याचवेळी बिहार विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने बहुतांश कामगारांनी येण्यास नकार दिला.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

रेल्वेचे तिकीट बुक करून देण्याची मागणी

आता निवडणूक व दिवाळीही संपल्याने या कामगारांनी महाराष्ट्रात कामाला येण्यासाठी ठेकेदार व उद्योगांकडे विचारणा सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यातील अनेकांनी विमानाचे तिकीट बुक करून देण्याची, तर काहींनी रेल्वेचे तिकीट बुक करून देण्याची मागणी केली आहे. काही कामगार खासगी गाडी करून यायलाही तयार असून, ठेकेदारांनी फक्त गाडी भाडे व व रस्त्यातील खर्चाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ठेकेदारांनीही आपली कामे सुरळीत व्हावीत म्हणून कामगारांना पायघड्या टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

निवडणुकीचे कारण देऊन येण्यास नकार

आमचे नातेवाईक लॉकडाउनच्या काळात गावी गेले. मात्र, तीन महिन्यांनंतर येथील कंपन्या सुरू झाल्या, त्या वेळी त्यांना परत बोलावले असता, निवडणुकीचे कारण देऊन त्यांनी येण्यास नकार दिला होता. आता मात्र त्यांचे फोन येत असून, ते परत येण्यास तयार आहेत. -रामलाल यादव, उत्तर भारतीय नागरिक 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

नोंदणीचे काय? 
दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार नाशिकसह महाराष्ट्रात स्थलांतरित होणार आहेत. त्यांची नोंदणी कशी होईल, याबाबत कामगार विभागासह अन्य यंत्रणा अनभिज्ञ आहे. याबाबत लवकरच उपायोजना न केल्यास पुन्हा स्थलांतरित कामगारांचा प्रश्‍न उपस्थित होणार, हे मात्र नक्की!  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asking workers for work after Bihar elections nashik marathi news