एका केंद्रावर लसीकरणाचे प्रयत्न निष्फळ! लसीकरणाचे ॲपच बंद पडल्याचा प्रकार उघड

विक्रांत मते
Sunday, 17 January 2021

महापालिकेला १६ हजार लस प्राप्त झाल्या असून, दहा टक्के लॉस वगळता १४,४०० लसीकरण महिनाभरात केले जाणार आहे. एका व्यक्तीला २८ दिवसांच्या अंतराने दोन लस टोचाव्या लागणार असल्याने ७,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस दिली जाणार आहे.

नाशिक : कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या कोव्हिशील्ड लसीकरणाला शनिवारी (ता.१६) पासून महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात सुरवात झाली. संदेश सोनवणे या आरोग्य कर्मचाऱ्याला पहिली लस टोचण्यात आली. एका केंद्रावर पहिल्या दिवशी ३०० लसीकरण करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. लसीकरणाचे ॲप बंद पडल्याने धावपळ उडाली. 

१४,४०० लसीकरण महिनाभरात केले जाणार

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या जुने व नवीन बिटको रुग्णालय, पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयात कोव्हिशील्ड लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी (ता.16) रोजी झाला. महापालिकेला १६ हजार लस प्राप्त झाल्या असून, दहा टक्के लॉस वगळता १४,४०० लसीकरण महिनाभरात केले जाणार आहे. एका व्यक्तीला २८ दिवसांच्या अंतराने दोन लस टोचाव्या लागणार असल्याने ७,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस दिली जाणार आहे. नवीन बिटको रुग्णालयात आरोग्य कर्मचारी संदेश सोनवणे यांच्यापासून लसीकरणाला सुरवात झाली. 

अॅप बंद पडल्याने धावपळ 

कोरोना लस कोणाला दिली, यासंदर्भातील माहिती शासनाच्या ॲपवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाल्यानंतर ॲप हॅंग झाले. त्यामुळे विलंब झाला. दुपारी तीनपर्यंत ९२ लसीकरण पूर्ण करण्यात आले. पहिल्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात आल्यानंतर अर्धा तासात परिणाम न झाल्याने घरी सोडून देण्यात आले. 

कोव्हिशील्डमुळे नवसंजीवनी 

कोरोना आजारावर लस उपलब्ध झाल्याने संजीवनी मिळली आहे. या माध्यमातून लवकरच नाशिक कोरोनामुक्त होईल, असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कोरोना परिस्थितीत उत्तम काम करून वैद्यकीय क्षेत्राने चांगली सेवा दिल्याचे आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले. आयुक्त कैलास जाधव म्हणाले, की पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना लस दिली जाणार आहे. दुसरा टप्पा नागरिकांसाठी असेल. कोरोना लस आली असली तरी मास्कचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी आभार मानले.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सरोज आहिरे, आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकूबाई बागूल, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नंदिनी बोडके, शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, नगरसेवक जगदीश पवार, प्रा. शरद मोरे, पंडित आवारे, राहुल दिवे, सूर्यकांत लवटे, कोमल मेहेरोलिया, डॉ. सीमा ताजणे, सुमन सातभाई, रंजना बोराडे, प्रताप मेहेरोलिया, आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेणकर आदी या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to vaccinate at one center failed nashik marathi news