BREAKING : बनावट पासपोर्ट प्रकरणी मालेगावी एकाला अटक; सहा संशयितही ताब्यात

प्रमोद सावंत
Friday, 6 November 2020

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी बांगलादेशी घुसेखोराला बनावट पासपोर्ट व बनावट दस्तऐवज प्रकरणी अटक केलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आणखी काही बांगलादेशी घुसेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मालेगाव (नाशिक) : शहरातील हजारखोली भागात वास्तव्याला असलेल्या आलम अमीन अन्सारी (वय ३८) या बांगलादेशी नागरिकाला आयेशानगर पोलिसांनी सापळा रचून पवारवाडी कार्यक्षेत्रातील मुंबई-आग्रा रोडवरील साई गोल्डन हॉटेलवरुन अटक केली. संशयिताला पोलिसी खाक्या दाखविल्या नंतर त्याला पासपोर्ट, शिधापत्रिका, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र यासह विविध बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा संशयितांनाही जेरबंद करण्यात आले आहे. 

एकूण सात जण ताब्यात

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी बांगलादेशी घुसेखोराला बनावट पासपोर्ट व बनावट दस्तऐवज प्रकरणी अटक केलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आणखी काही बांगलादेशी घुसेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी सांगितले, की पोलिसांना हजारखोलीत बांगलादेशी घुसेखोर वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे आलम अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याला शहरात घर घेवून देण्यासाठी अश्पाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजारखोली) याने मदत केली. त्यावरुन त्याची शिधापत्रिका व आधारकार्ड तयार झाले. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र व पासपोर्टसह त्याला विविध बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या एकलाख अहमद मोहंमद मुस्तफा (रा. नयापुरा), इम्रान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इकबाल खान मुनीर खान (रा. तंजीबनगर), ललीत मराठे (रा. कैलासनगर) व जाकीर अली अब्दुल मजीदखान (रा. अख्तराबाद) या सहा जणांसह एकूण सात जणांना शुक्रवारी (ता. ६) सकाळी अटक करण्यात आली. 

हेही वाचा > काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान संशयितांचा कारनामा

जहीर हाशीम हनिबा हा अन्य एक बांगलादेशी नागरीक फरार आहे. १ ऑक्टोबर २०२० ते ५ नोव्हेंबर २०२० दरम्यान संशयितांनी हा कारनामा केला. पोलिसांनी अलम अन्सारी याचा पासपोर्ट जप्त केला आहे. या सात जणांविरुध्द आयेशानगर पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट दस्तऐवज, परकीय नागरीक कायद्याचे उल्लंघन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गिरी, हवालदार राजेंद्र चौधरी, पोलिस नाईक श्याम पवार, योगेश ठाकूर, हेमंत देवरे, भारत पाटील, दीपक खैरनार आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshs people national arrested in Malegaon, also Six suspects arrested nashik marathi news