कुटुंब चालवायचे कसे? ‘बार्टी’च्या समतादूतांना सहा महिन्यांपासून वेतन नाही

विजय पगार
Tuesday, 27 October 2020

समतादूत हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका व गाव-खेड्यात राबविला जात आहे. अनुसूचित जातीतील, तसेच समाजातील दुर्बल वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकसह सर्वच पातळीवर विकास व्हावा म्हणून ‘बार्टी’ मुख्यालयाच्या सूचनेनुसार हे समतादूत काम करीत आहेत

नाशिक/इगतपुरी : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’मधील कार्यरत समतादूतांवर सहा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने उमासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे, उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. 

समतादूत हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका व गाव-खेड्यात राबविला जात आहे. अनुसूचित जातीतील, तसेच समाजातील दुर्बल वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकसह सर्वच पातळीवर विकास व्हावा म्हणून ‘बार्टी’ मुख्यालयाच्या सूचनेनुसार हे समतादूत काम करीत आहेत. समता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक जाणीवजागृती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, सांप्रदायिक सहिष्णुता व सद्‍भावना समाजाच्या विविध घटकांमध्ये वाढविण्यासाठी व जातीय दुर्भावनांचे व अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधांबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी शासनाने समतादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. 

कोरोनाच्या काळातही सर्वेक्षण व प्रबोधन

त्यासाठी प्रशिक्षण घेऊन राज्यात सुमारे साडेतीनशे समतादूतांची नेमणूक केली आहे. या समतादूतांनी गावनिहाय सर्वेक्षण, संविधान साक्षर अभियान, शेतकरी सर्वेक्षण, रेशीम अभियान, विधवा-परित्यक्ता महिलांचे सर्वेक्षण, शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन प्रबोधन आदी कामे केली. कोरोनाच्या काळातही प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नसताना गावपातळीवर प्रत्यक्ष जाऊन संपूर्ण राज्यात ५९ अनुसूचित जातींचे सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व प्रबोधन केले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

अद्याप न्याय नाही...

याबाबत समतादूत म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी म्हणाले, की पाच वर्षांषासून समतादूत म्हणून काम पाहतो आहोत. शासनाने सहा महिने आमचा पगार न दिल्याने राज्यातील साडेतीनशेहून अधिक समतादूतांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॅाकडाउनमध्येही आमचे काम सुरूच असून, वेतन मात्र मिळत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील समतादूतांना तातडीने पगार मिळावा, यासाठी शासनाकडे मागणीही केली आहे; परंतु आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barti samajdoot has not been paid for six months nashik marathi news