
नाशिक : शिवसेना संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. हा संघर्ष आपल्याला कायम पुढे ठेवायचा आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात शहरात कुठलेही ठोस असे काम झाले नाही. त्यामुळे या संघर्षाला अधिक धार चढवत महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
प्रभागनिहाय संघटना पुनर्बांधणीचे संकेत
शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पदभार स्वीकारला. या वेळी सत्काराला उत्तर देताना बडगुजर यांनी महापालिकेवर भगवा फडकविण्याचे आवाहन केले. बडगुजर म्हणाले, की पक्षसंघटना चालविताना जुन्या व नव्या पदाधिकारी व शिवसैनिकांना बरोबर घेऊन काम करणार आहे. २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असून, या निवडणुकीत नागरिकांसमोर जाऊन भाजपच्या नाकर्तेपणाचा पाढा नाशिककरांसमोर मांडणार आहे. महापालिकेत भाजपकडून अपेक्षित कामे न झाल्याने नाशिककरांना शिवसेनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून दीड वर्षात झालेल्या कामांमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचा झंझावात कायम ठेवून नागरिकांना अपेक्षित सरकार देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पक्ष बळकट करताना प्रभागनिहाय संघटना पुनर्बांधणीचे संकेत त्यांनी दिले.
शिवसेना सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होणार
भाजपच्या यशाचे गमक सोशल मीडिया असून, शिवसेनाही आगामी काळात सोशल मीडियावर भर देणार आहे. प्रभागनिहाय संघटना भक्कम करताना सोशल मीडियाप्रमुखांचीही नियुक्ती केली जाणार असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी जाहीर केले. सोशल मीडियावर शिवसैनिकांनी ॲक्टिव्ह होत असतानाच वास्तवाचे भान ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीद्वारे झालेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. जानेवारीपासून वॉर्ड तेथे शाखा तयार करण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
स्वबळाचा नारा
माजी मंत्री बबन घोलप यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळावर निवडणूक लढवावी, असे सांगितले. निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटप करणे शक्य नाही. जागावाटपाचे सूत्र तरी कसे निश्चित करणार, असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत महानगप्रमुख बडगुजर यांनी पहिल्याच बैठकीत दिले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, माजी आमदार योगेश घोलप, महापालिका गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, जगन आगळे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.