रामकुंड परिसराला पुन्हा भिकाऱ्यांचा विळखा; प्रादुर्भावाची भीती 

दत्ता जाधव
Tuesday, 22 September 2020

रामकुंडासमोरच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर दुचाकी उभ्या असतात. याशिवाय वस्त्रांतरगृहाशेजारी रिक्षा स्टॅन्डही आहे. याशिवाय या ठिकाणी येणारे अनेक जण रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. येथील पोलिस चौकीतून सातत्याने आवाहन करूनही अनेक जण भररस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने कोंडीत भरच पडत आहे. 

नाशिक / पंचवटी : काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोहीम राबविल्यावर रामकुंडासह संपूर्ण गंगाघाटावरील गायब झालेले भिकारी पुन्हा दिसू लागले आहेत. अधिकमासात दानशूरांची संख्या वाढल्याने रामकुंड परिसराला पुन्हा भिकाऱ्यांचा विळखा पडला आहे. दानधर्म करताना सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळला जात नसल्याचे चित्र आहे. 

मोठ्या प्रमाणावर भिकाऱ्यांनी मांडला ठिय्या
२२ मार्चच्या लॉकडाउननंतर महापालिका व पोलिस प्रशासनाने रामकुंडावर फिरण्यास व भिक्षा मागण्यास मनाई केली होती. इतकेच नव्हे, तर या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तात्पुरत्या निवारागृहात केली होती. त्यामुळे रामकुंड परिसरातील सगळेच भिकारी, गर्दुल्ले गायब झाले होते. मात्र कालांतराने प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यावर येथे पुन्हा मोठ्या प्रमाणावर भिकाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. हे लोक श्राद्धादी विधी करण्यासाठी रामकुंडावर येणाऱ्या भाविकांनाही भिकेसाठी त्रस्त करत असल्याचे दिसून येते. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

चोऱ्यांमध्ये मोठी वाढ 
रामकुंडावर पंचवटी पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस चौकी कार्यरत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांकडून सातत्याने रामकुंडावर ‘भीक देऊ नका, गर्दी करू नका’ असे आवाहन केले जाते; परंतु दानधर्म करणारे व स्वीकारणारे असे दोन्ही वर्ग त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. अधिकमासामुळे रामकुंडावरील धार्मिक विधींत वाढ झाल्याने भुरट्या चोरट्यांचे फावते आहे. धार्मिक विधींसाठी आलेल्या अनेकांच्या वस्तू हातोहात लंपास केल्या जातात. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

पार्किंगचा प्रश्‍न गंभीर 
रामकुंडासमोरच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर दुचाकी उभ्या असतात. याशिवाय वस्त्रांतरगृहाशेजारी रिक्षा स्टॅन्डही आहे. याशिवाय या ठिकाणी येणारे अनेक जण रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. येथील पोलिस चौकीतून सातत्याने आवाहन करूनही अनेक जण भररस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने कोंडीत भरच पडत आहे. 

रामकुंड परिसरातील भिकाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. हे लोक भिक्षेतून मिळालेले उरलेले अन्न जागेवरच टाकून देत असल्याने आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. -गजानन दीक्षित, पंचवटी  
 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beggars again in Ramkund area nashik marathi news