शेतकऱ्यांनो! आता एकाच अर्जाद्वारे घेता येणार तब्बल ५० हून अधिक योजनांचा लाभ

farmer online.jpg
farmer online.jpg

येवला (जि.नाशिक) : ऑनलाइन एकच अर्ज भरा, ज्या योजनेचा लाभ घ्यायचा त्याचा प्राधान्यक्रम भरा आणि लाभ मिळेपर्यंत संपूर्ण माहिती घरबसल्या मिळवा. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागाने अशी सोपी पद्धत विकसित केल्याने शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना एक-दोन नव्हे, तर तब्बल ५० हून अधिक योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेता येणार असून, महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभासाठी आतापर्यंत एक लाख २० हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. 

एका अर्जावर शेतकऱ्यांना ५० वर कृषी योजनांचा लाभ 
सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केल्याने शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. शेतकरी वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न करून महाडीबीटी https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून नोंदणी करू शकणार आहेत. 

सर्व प्रक्रिया ऑनलाइन
शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करताना आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करणे बंधनकारक असणार आहे. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी, तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे या सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे योजनेची स्थिती पाहण्यासाठी लाभार्थींना वारंवार कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येणार नाही. 

बदल करण्याची मुभा पोर्टलवर
महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली असून, यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. लाभाच्या घटकांमध्ये शेतकऱ्यांना बदल करावयाचा असल्यास बदल करण्याची मुभा पोर्टलवर दिलेली आहे. ठिबक व तुषार संचासाठी पूर्वी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनाही परत अर्ज करावे लागणार आहेत. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

...या योजनांचा मिळेल लाभ 
- तुषार सिंचन, ट्रॅक्टर, पॉवर टिलरचलित अवजारे, बैलचलित यंत्र/अवजारे, मनुष्यचलित यंत्र/अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्च्यात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र/अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे, कृषी अवजारे बँकेची स्थापना, उच्च तंत्रज्ञान, उत्पादनसेवा सुविधा केंद्र, रोपवाटिका, उतीसंवर्धन प्रयोगशाळा, बळकटीकरण/पुनरुज्जीविकरण, नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा, भाजीपाला विकास कार्यक्रम, गुणवत्तापूर्ण लागवड, साहित्य आयात, भाजीपाला, बियाणेप्रक्रिया, पॅकिंग, साठवण पायाभूत सुविधा, नवीन बागा, फलोत्पादन यांत्रिकीकरण, अळिंबी उत्पादन, पुष्प उत्पादन, मसाला पिके लागवड, फळबागांचे पुनरुज्जीविकरण, हरितगृह, शेडनेट हाउस, पक्षीरोधक जाळी, प्लॅटिक आच्छादन, सेंद्रिय शेती, मधुमक्षिका पालन, पॅकहाऊस, एकात्मिक पॅकहाऊस, पूर्व शीतकरणगृह, शीतखोली, पणन सुविधा स्थापन करणे, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण. 

लाभार्थ्यांची संख्या व उद्दिष्ट्ये वाढवून मिळावे

शेतकऱ्यांना कृषी संदर्भात प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची तसदी महाडीबीटी योजनेमुळे थांबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लाभासाठीच्या अर्जाची संख्या लाखांत पोचल्याने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शासनस्तावरून जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांची संख्या व उद्दिष्ट्ये वाढवून मिळावे. -संजय बनकर, सभापती कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद नाशिक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com