शेतकऱ्यांसाठी खूशखबर! कृषी योजनांचा लाभ मिळणार एका क्लिकवर; एका अर्जात काम

संतोष विंचू
Friday, 6 November 2020

लाभासाठी तालुकास्तरावर संगणकीय सोडत काढली जाणार असून, प्रत्येक टप्प्यावरची माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविली जाईल. तर ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नसेल त्यांना प्रतीक्षायादीत क्रमवारीनुसार ठेवण्यात येईल. 

येवला (नाशिक) : प्रत्येक वर्षी प्रत्येक योजनेच्या लाभासाठी नव्याने अर्ज भरा, लाभाची प्रतीक्षा करा अन् संधी हुकली की पुन्हा पुढच्या वर्षी अर्ज भरा, अशा लांबलचक प्रक्रियेतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. आता कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजन’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. कसे ते एकदा वाचाच...

एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार 

आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर पंधराहून अधिक योजनांचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना दरवेळी अर्ज भरावे लागत होते. पण पोर्टलमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असून, निवडीचे स्वातंत्र्यदेखील देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय पद्धतीने सोडत काढून निवड करण्यात येणार असल्याने योजनेत पारदर्शकता टिकून राहील. यापूर्वीच या पोर्टलचे उद्‍घाटन झाले असून, आता अधिकृतपणे गुरुवारी (ता. ५) त्याची घोषणा झाली. 
सद्यःस्थितीत प्रधानमंत्री कृषी सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, अन्नसुरक्षा अभियान, अन्नधान्य व तेलबिया पिके, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड, आदिवासी कृषी क्रांती योजना, कृषी स्वावलंबन योजना तसेच कृषी विकास योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचा योजनेत समावेश केला असून, टप्प्याटप्प्याने इतर योजनांचादेखील समावेश होणार आहे. 

अशी होईल नोंदणी... 

https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टलवर संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकरी भरू शकतील. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम पासवर्ड तयार करावा लागणार असून, त्यानंतर नोंदणी करावी लागेल. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करताना शेतकऱ्यांना आधार क्रमांकही प्रमाणित करून घ्यावा लागेल. आधार क्रमांक प्रमाणित केल्याशिवाय अनुदानाचे वितरण होणार नाही. पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, औषधे, खते, फलोत्पादन, अनुसूचित जाती-जमातीच्या योजना असे पाच घटक करून त्यात विविध उपयोजनांचा समावेश करण्यात आला आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांना २३ रुपये ६० पैसे ऑनलाइन भरावयाचे असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. लाभासाठी तालुकास्तरावर संगणकीय सोडत काढली जाणार असून, प्रत्येक टप्प्यावरची माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविली जाईल. तर ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नसेल त्यांना प्रतीक्षायादीत क्रमवारीनुसार ठेवण्यात येईल. 

हेही वाचा >   काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

वर्षानुवर्षे कृषी योजनांच्या लाभासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्याने नक्कीच शेतकरीहित साधले जाणार आहे. पोर्टलमुळे लाभार्थ्यांना सर्व माहिती घरपोच मिळणार असून, लाभ देण्यात पारदर्शकता येणार आहे. - संजय बनकर, सभापती, जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefit of Farmers Schemes on Mahadibt Portal nashik marathi news