गुन्हेगारीचे जंक्शन हा 'शिक्का' आता पुसला जाणार...भद्रकालीला मिळणार नवा आयाम!

bhadrkali.jpg
bhadrkali.jpg

नाशिक : शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या भद्रकाली भागाचे नाव देवी मंदिरामुळे प्रसिद्ध असले तरी अनेक वर्षांपासून गुन्हेगारीला पोषक ठरणा-या विविध प्रकारच्या धंद्यांमुळे या भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. नकारात्मकतेच्या शिक्क्यामुळे नुकसान होत असल्याने ही बाब ध्यानात घेऊन या भागाला नवीन ओळख निर्माण करण्यासाठी स्थानिक हरहुन्नरी युवकांनी पुढाकार घेतला आहे. 

सकारात्मकतेत रूपांतर करण्याचा निर्णय

१९६५ ते २००० पर्यंत शहराची प्रमुख बाजारपेठ असलेला भद्रकाली परिसर भाजी बाजार, टॅक्सी स्टॅन्ड, लोखंड बाजार, अंत्यविधीच्या साहित्यापासून सर्व सामान्यांच्या दैनंदिन गरजा भागविणा-या सर्व वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण होते. सर्व प्रकारचा ग्राहकवर्ग या भागात येत असल्याने जसे चांगले व्यवसाय येथे थाटले गेले त्याचप्रमाणे आंबट शौकिनांचे शोक पूर्ण करणा-या धंद्यांनीही जम बसविला. काळाच्या ओघात शहर वाढल्याने सर्वसामान्यांनी या भागाकडे पाठ फिरवत वाढत्या शहराची वाट धरली. परंतु अद्यापही आंबट शौकिनांचे शौक पूर्ण करण्यासाठी शहरात हेच एकमेव ठिकाण ठरले. सध्याच्या काळात मोक्याची जागा असतानाही नकारात्मकतेचा शिक्का पुसता पुसत नसल्याने अखेर या भागातील नव्या पिढीने नकारात्मकतेचे सकारात्मकतेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. 

नवीन व्यवसायांना सुरवात

 टॅक्सी स्टॅन्ड, पिंपळ चौक, व्हिडिओ गल्ली आदी भागात असलेले दोन नंबरचे धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक सेंट्रल मार्केट कमिटी स्थापन करण्यात आली असून, कायदेशीर नोंदीसाठी प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. कमिटीमध्ये अध्यक्षपदी चेतन शेलार, उपाध्यक्षपदी मनोज लड, सरचिटणीसपदी गणेश शेलार, अतुल विसे, सागर विसे, श्रीकांत इशे, शैलेश मंडाले आदींचा समावेश आहे. या भागात सॅटेलाइटच्या जमान्यातही २५ ते ३० व्हिडिओ पार्लर आहेत. व्हिडिओ हॉल, ताडी, दारू दुकाने असे सर्व व्यवसाय बंद करून जुने वाडे, घरे, दुकाने, व्हिडिओ पार्लरच्या जागेवर नाशिक सेंट्रल मार्केटची उभारणी करून नवीन व्यवसायांना सुरवात केली जाणार आहे. युवकांच्या या संकल्पनेला स्थानिक ज्येष्ठांनी पाठिंबा दिला आहे. संकल्पना प्रत्यक्षात आल्यास भद्रकाली परिसरावर लागलेला नकारात्मकतेचा शिक्का पुसला जाणार आहे. 

हुंडीवाला लेन, रविवार कारंजा, घनकर लेनप्रमाणेच आमच्या भागाकडेही अभिमानाने लोकांनी पाहावे हा आमचा हेतू आहे. त्यामुळे नाशिक सेंट्रल मार्केटच्या माध्यमातून या भागाला नवीन ओळख देण्याचा आमचा प्रयत्न आहे. - चेतन शेलार, अध्यक्ष- नाशिक सेंट्रल मार्केट 


टॅक्सी स्टॅन्ड भागातील मैदानात खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या लागत असल्याने तेथे मद्यपींचा अड्डा बनला आहे. आंबट शौकिनांची संख्या वाढल्याने या भागाकडे नकारात्मक नजरेने पाहिले जाते. त्यामुळे येथे बदल आवश्यक आहे. - शैलेश मंडाले 


नाशिक सेंट्रल मार्केट उभारण्याबरोबरच या भागाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. आंबट शौकिनांची गर्दी वाढत असल्याने सर्वप्रथम या भागातील खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या सर्वप्रथम हटविल्या जाणार आहेत. - सागर विसे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com