शेतकऱ्यांनो, टप्प्याटप्प्याने उन्हाळ कांदा विका; भारत दिघोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन 

संतोष विंचू
Friday, 27 November 2020

शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक केल्याने कांद्याच्या भावावर नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र अजूनही २० ते २५ दिवस हातात असल्याने बाजार समितीत एकच गर्दी न करता हा कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीला आणावा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले. 

येवला (नाशिक) : शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक केल्याने कांद्याच्या भावावर नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र अजूनही २० ते २५ दिवस हातात असल्याने बाजार समितीत एकच गर्दी न करता हा कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीला आणावा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले. 

शेतकऱ्यांना आवाहन करताना दिघोळे म्हणाले, की देशात पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता नसून घाबरून न जाता आपला कांदा विक्रीला आणताना तो थोडा थोडा आणावा, जास्त गर्दी न करता कांद्याची विक्री करावी. ज्या वेळी बाजार समितीत कांद्याची आवक कमी होईल, तेव्हाच कांद्याचे भाव वाढतील. 
यापुढे तरुण शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकरी नाही, तर कांदा उद्योजक शेतकरी होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून व परदेशातील कांदा आयात करण्याचे बंद करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे दिघोळे यांनी सांगितले.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

रखडलेले पैसे तत्काळ मिळावेत; अन्यथा ..

येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देशासह परदेशी बाजारपेठा काबीज करण्यासाठी उत्पादकांना कांद्याच्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनासह मार्केटिंग करणे जरुरीचे असून, कांद्याच्या पिकातून उत्पादकांची आर्थिक सक्षमता निर्माण करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे ते म्हणाले. काही वर्षांपासून उपबाजार, अंदरसूल येथे विक्री केलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे तत्काळ मिळावेत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपसमिती, अंदरसूल येथे त्यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या व बाजारभावाचा चढ-उतार याविषयी चर्चा करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत समस्या जाणून घेतल्या. 
जिल्हा युवा अध्यक्ष केदारनाथ नवले, तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, रामदास आदमने, प्रवीण शिंदे, दशरथ भागवत, गोकुळ भोरकडे, प्रमोद भागवत, दत्तू खोकले, योगेश उशीर, विष्णू गीडगे, साईनाथ साबळे, संजय शेजवळ आदी शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Dighole urged the farmers to sell summer onion in phases nashik news