''मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी भुजबळांना टार्गेट केलं जातयं''

विक्रांत मते
Sunday, 20 September 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर श्री. भुजबळ यांच्या कार्यालयात पेढे वाटण्यात आल्याच्या खोट्या बातम्या यापूर्वी देखील पसरविण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नव्हते. यावरून काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यातून हेतुपुरस्सरपणे बदनाम केले जात असल्याचे स्पष्ट होते. 

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी निवेदन चिकटविण्याबरोबरच घोषणा देण्यात आल्याच्या प्रकारानंतर श्री. भुजबळ यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते सरसावले. ज्यांनी आंदोलन केले त्यांची राजकीय पार्श्‍वभूमी लक्षात घेता राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रकार घडला असून, बदनामीसाठी खोटा प्रचार केल्याचा आरोप समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी करत श्री. भुजबळ यांना समर्थन दिले. 

मराठा समाजातील ज्येष्ठ नेते भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात

पोलिस भरती रद्द करावी व मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भुजबळ फार्मवर शुक्रवारी (ता. १८) आंदोलन करण्यात आले. श्री. भुजबळ यांनी सकल मराठा समाज समन्वयकांच्या मान्यतेने दुपारी दीडला भेटण्याचे निश्‍चित केले होते. परंतु त्यापूर्वी एकला आंदोलनकर्ते निघून गेले. जाताना प्रवेशद्वारावर निवेदन चिकटविताना विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने श्री. भुजबळ यांच्याविषयी चुकीचा समज पसरविला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजातील ज्येष्ठ नेते शनिवारी (ता. १९) भुजबळ यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करण्यात आल्याचा दावा करताना श्री. भुजबळ यांच्या बदनामीसाठी खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप प्रसिद्धीला दिलेल्या संयुक्त निवेदनात करण्यात आला आहे. 

समाजाची दिशाभूल करण्याचा व बदनामीचा प्रयत्न

नियोजित कार्यक्रम आटोपून श्री. भुजबळ दहा मिनिटांत कार्यालयात पोचणार होते व तसा निरोपदेखील आंदोलनकर्त्यांना देण्यात आला होता. परंतु चर्चेऐवजी बदनामीच्या उद्देशाने आलेल्या काही मोर्चेकऱ्यांनी ते कार्यालयात पोचण्यापूर्वीच भाषणबाजी करीत निघून गेले. भेटीची वेळ ठरली असताना त्यापूर्वीच मोर्चेकरी निघून गेले. यावरून काही संघटनांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा व बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होते. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर श्री. भुजबळ यांच्या कार्यालयात पेढे वाटण्यात आल्याच्या खोट्या बातम्या यापूर्वी देखील पसरविण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नव्हते. यावरून काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यातून हेतुपुरस्सरपणे बदनाम केले जात असल्याचे स्पष्ट होते. 

मूळ उद्देशाकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात असून, शासनाच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. परंतु आरक्षणाच्या माध्यमातून श्री. भुजबळ यांना लक्ष्य करून मूळ उद्देशाकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब मराठा समाज बांधवांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव, नाना महाले, ॲड. रवींद्र पगार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

दुरावा नसल्याचा मोर्चाकडून निर्वाळा 

दरम्यान, शुक्रवारी भुजबळ फार्मवर घडविण्यात आलेल्या प्रकारावरून मराठा समाजातदेखील नाराजी पसरली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी भाजपचे उपाध्यक्ष सुनील बागूल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या वेळी मराठा क्रांती मोर्चा व श्री. भुजबळ यांच्यात दुरावा नसल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या दोन दिवसांत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री. भुजबळ यांची भेट घेणार असून, त्यात राज्यासह केंद्र सरकारकडे बाजू मांडण्याचा आग्रह धरणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला करण गायकर, गणेश कदम, चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार गवळी आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal has the support of Maratha community leaders nashik marathi news