"नुकसानीचे स्वरूप मोठे, केंद्राकडूनही मदत मिळावी" - छगन भुजबळ  

गोपाळ शिंदे
Tuesday, 20 October 2020

इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खंबाळे शिवारात त्यांनी सोमवारी (ता. १९) भात पिकांची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. 

नाशिक/घोटी : डौलाने उभी राहिलेली पिके पावसाने नेस्तनाबूत झाली आहेत. संबंध जिल्ह्यात हीच परिस्थिती असल्याने पीक पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येणार नाही. ती तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात शासनास सूचना करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे स्वरूप नेहमीपेक्षा मोठे असून, याकरिता केंद्राकडून मदत मिळायला पाहिजे. बाधित क्षेत्राची पाहणी झाल्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही अन्न व नागरी पुरवठामंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत​

इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खंबाळे शिवारात त्यांनी सोमवारी (ता. १९) भात पिकांची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल त्यांनी तातडीने संबंधित विमा कंपनीकडे रीतसर अर्ज दाखल करावे. मदत मिळणारच आहे; मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्यांसारखा विचार करू नये. शेतकऱ्यांना समृद्ध व सक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काही शेतकऱ्यांशी हितगुज साधताना काळजी घ्या, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, यासाठी आग्रहाची भूमिका आम्ही घेणार आहोत, अशी भावनिक साद घातली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

या वेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर, मंडळधिकारी श्याम बोरसे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, उपसरपंच दिलीप चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, युवकचे उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर, नारायण चौधरी, ज्ञानेश्वर पढेर, कचरू शिंगोटे, विठोबा शिंदे, अशोक मांडे, सुनील चौधरी, मनसेचे भोलेनाथ चव्हाण, हरीश चव्हाण आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal inspected the loss of farmers due to heavy rains in Igatpuri nashik marathi news amp?