मका खरेदी प्रक्रिया २९ जानेवारीपर्यंत पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश 

संतोष विंचू
Sunday, 24 January 2021

मका खरेदीसाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्या मुदतीच्या आत २९ जानेवारीपर्यंतच संपूर्ण मका खरेदी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

येवला (जि. नाशिक) : मका खरेदीसाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्या मुदतीच्या आत २९ जानेवारीपर्यंतच संपूर्ण मका खरेदी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

कोणत्याही शेतकऱ्यांचा मका शिल्लक राहू नये

भुजबळ म्हणाले, की मका खरेदीसाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत मका खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रंदिवस खरेदी सुरू ठेवून २९ तारखेपर्यंत मका खरेदी पूर्ण करण्यात यावी, असे आदेश देत कोणत्याही शेतकऱ्यांचा मका शिल्लक राहू नये, अशा सूचना केल्या. शहरात असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, तसेच येवला शहरातील विंचूर चौफुलीसह इतर वाहतूक बेटांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे. शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

...अन्यथा कारवाईला सामोरे जा 

शहरातील विस्थापित झालेल्या गाळेधारकांना नवीन इमारतीत ५० टक्के आरक्षण ठेवून त्यांना प्राधान्याने गाळे देण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. तसेच येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून येत्या १५ दिवसांच्या आत उद्‌घाटन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे सांगत कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा भुजबळ यांनी या वेळी दिला. 

पालकमंत्री भुजबळ रविवारी (ता. २४) येवला दौऱ्यावर आले असताना त्यांनी संपर्क कार्यालयात कोरोना, मका खरेदीसह प्रलंबित विकासकामांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरण विभागाच्या उपअभियंता पिनल दुसाने, उमेश चौधरी, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal ordered to complete the maize procurement process by January 29 Nashik Marathi news