लॉकडाउनमध्ये दुर्मिळ धनेशचे "रेस्क्‍यू ऑपरेशन' करताच 'तो" निसर्गाशी झाला एकरूप!

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 एप्रिल 2020

गोविंदनगरमध्ये मनोज वाघमारे यांना तो रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला. गाडीला धडकून जखमीला त्यांनी घरी नेले. सुरवातीचे दोन दिवस तो काहीच खात नव्हता. त्यामुळे मनोज यांनी त्याला फळांचा रस पाजला. त्यासाठी "ट्यूब फीड'चा उपयोग केला. चार दिवसांनंतर त्याची तब्येत चांगली होऊ लागली.

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये नाशिकमध्ये पक्षीमित्र आणि वन विभागाने दुर्मिळ धनेश पक्ष्याचे "रेस्क्‍यू ऑपरेशन' करत प्राण वाचविले. त्याच्यावर दहा दिवस उपचार सुरू होते. त्याला फळांचा रस पाजण्यात आला. 

अशी घडली घटना..
गोविंदनगरमध्ये मनोज वाघमारे यांना एक पक्षी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला. गाडीला धडकून जखमी झालेल्या पक्ष्याला त्यांनी घरी नेले. सुरवातीचे दोन दिवस तो काहीच खात नव्हता. त्यामुळे मनोज यांनी त्याला फळांचा रस पाजला. त्यासाठी "ट्यूब फीड'चा उपयोग केला. चार दिवसांनंतर त्याची तब्येत चांगली होऊ लागली. नंतर उंबर, केळी, पपई आदी फळे खायला घातली. धनेशने आवडीने फळे खाल्ली. दहा दिवसांनंतर पक्षी पूर्ण बरा झाला. अशातच, संचारबंदी लागू झाली. पक्ष्याला निसर्गात सोडायचे कसे, असा प्रश्‍न तयार झाला. शेजारून फळे आणून त्यापासून रस बनवून पाजला. त्याच वेळी नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील वनपाल अशोक काळे यांच्याशी मनोज यांनी संपर्क साधला. काळे यांनी सिडकोमधील मनोज यांचे घर गाठले आणि धनेश पक्ष्याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करून त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांच्या परवानगीने वन विभागाच्या जुन्या रोपवाटिकेत सोडण्यात आले. धनेश लगेच निसर्गाशी एकरूप झाला. 

धनेशविषयीची माहिती 
युसेरॉटिडी कुळातील पक्षी. आफ्रिका आणि आशिया खंडांतील उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. जगात सुमारे 55 जाती मोठ्या आकाराची काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार चोच. चोचीवरून इंग्रजीत "हॉर्नबिल' हे नाव. देशात आढळणारा राखी धनेश हा 24 इंच आकाराचा. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा अधिक लांब. सर्व वेळ झाडावर घालवतो. वड, पिंपळ अशा वृक्षांवरील फळे, मोठे किडे, पाली, सरडे, उंदीर, क्वचितप्रसंगी लहान पक्षी खातो. मार्च ते जूनमध्ये अंड्याचा कालावधी. झाडांच्या ढोलीत घरटे केले जाते. मादी ढोलीत बसल्यावर नर आणि मादी थोडी फट ठेवून ती आपल्या विष्ठेने बंद करतात. घरट्यात मादी एका वेळी दोन ते तीन अंडी देते. नर घरट्याबाहेर राहून ढोलीतील मादीला अन्न खाऊ घालतो. मादी ढोलीत राहून अंडी उबविण्याचे काम करते. अंड्यातून पिले बाहेर आल्यावर मादी आपल्या घरट्याचे आवरण फोडून बाहेर येते. नर आणि मादी ढोली पूर्वीसारखे बंद करून पूर्ण वाढ होईपर्यंत दोघेही पिल्लांना अन्न खाऊ घालतात. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

पक्षीमित्र अन्‌ वन विभागाने वाचविले प्राण; दहा दिवस फळांचा रस 
दुर्मिळ धनेश पक्ष्याचा दहा दिवस सांभाळ केला. संचारबंदीमध्ये धनेशला वन विभागाने निसर्गात मुक्त केले. - मनोज वाघमारे, पक्षीमित्र 

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird-friend and Forest Department rescues lives in lockdown nashik marathi news