नाशिकमध्ये भाजप-सेनेचे आंदोलन वॉर! जशास तसे उत्तर देण्यासाठी कसली कंबर

विक्रांत मते
Friday, 5 February 2021

शिवसेना व भाजपच्या आंदोलनाचा जशास तसे उत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे.

नाशिक : वीज थकबाकी अदा न केल्यास वीजजोडणी खंडित करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी (ता. ५) वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल व टाळे ठोको आंदोलन केले जाणार असतानाच शिवसेनेनेही भाजपच्या या आंदोलनाचा जशास तसे उत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. इंधन दरवाढीचे निमित्त साधून केंद्र सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

जशास तसे उत्तर देण्यासाठी कंबर कसली
वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे भाजपने या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर महावितरणच्या कार्यालयांना टाळे लावण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. नाशिक शहरातही भाजपतर्फे नाशिक रोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. तसेच शहरातील वीज वितरण कार्यालयासमोर हल्लाबोल व टाळे ठोको आंदोलन केले जाणार आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नाशिकमध्ये भाजप-सेनेचे आंदोलन वॉर!

भाजपच्या या आंदोलनाला उत्तर देण्याचा भाग म्हणून शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निमित्ताने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचे दर शंभर रुपयांपर्यंत पोचत असल्याने शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. नाशिकमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP shivsena agitation war in Nashik political marathi news